लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : येथील रेल्वेस्थानकात नांदेडला जाण्यासाठी परळी- अकोला गाडीत चढल्यानंतर एका प्रवाशाची बॅग प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर विसरून राहिली होती. या बॅगमध्ये महिलेचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर ऐवज होता. ही बॅग रेल्वे पोलिस फोर्स (आर.पी.एफ.) परळीचे जमादार पी.राजशेखर यांनी ताब्यात घेऊन संबंधित प्रवाशी व्यक्तीशी संपर्क साधला. ती बॅग सन्मानपूर्वक प्रवाशाला परत दिली. प्रवासी महिलेने रेल्वे पोलिसांचे आभार मानले.नांदेड येथील कुरील पती-पत्नी बीडहून नांदेड येथे जाण्यासाठी रेल्वेची वाटप पाहत होते. कुरील कुटुंब हे नांदेडला निघाले होते. त्यांच्यासोबत कपड्याची बॅग होती या बॅगमध्ये मनी-मंगळसूत्र व पाच ग्रॅम सोने असलेल्या बांगड्या होत्या. तसेच इतर कागदपत्र व कपडे देखील होते. परळी-अकोला गाडी पकडण्याच्या गडबडीत प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर बॅग विसरली. अकोला रेल्वेत बसल्यानंतर बॅगचा शोध घेतला परंतु बॅग आढळून आली नाही. त्यामुळे परळीतच बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. पूर्णाजवळ रेल्वे आल्यानंतर कुरील यांनी परळी रेल्वेस्थानकातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून बॅग विसरल्याचे कळविले. रेल्वे पोलीस फोर्स परळीचे जमादार राजशेखर यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर पाहणी केली असता बॅग तेथे मिळून आली. त्यांनी लागलीच वरिष्ठांना व कुरील यांना बॅग असल्याची माहिती दिली. कुरील हे पूर्णा येथून बॅग घेण्यासाठी परत परळी रेल्वेस्थानकात आले. त्यानंतर सदरील बॅग पोलिसांनी त्यांना सुपूर्द केली. यावेळी रेल्वे पोलिस फोर्स परळीचे पोनि श्रीराम मीना, जमादार पी. राजशेखर, एस.के ताहीर, एम.लक्ष्मण व इतर कर्मचारी उपस्थित होते.
रेल्वेस्थानकावर विसरलेली बॅग प्रवाशाला सन्मानपूर्वक परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:56 AM