माजलगाव : कोरोनाच्या संकटामुळे सर्व जण हवालदिल झालेले असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत, असा आरोप मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी केला. या दरवाढीचा फटका बळीराजाला बसणार असल्याने ही वाढ तत्काळ मागे न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोरोनामुळे सर्व ठप्प असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला बळीराजाने बळ दिले, अन्नधान्य, भाजीपाल्यात कुठेही कमतरता पडू दिली नाही. त्याच बळीराजाच्या जीवावर केंद्रातील राज्यकर्ते उठले आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन उभारले त्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलनाचा वचपा म्हणून खतांची भाववाढ केली आहे. अस्मानी संकट पाचवीला पुजले असताना आता सुलतानी संकट डोक्यावर लादले आहे, अशी टीकाही डक यांनी केली. ११०० रुपयांचे डीएपी खत १९०० रुपये झाले यावरून या दरवाढीचा अंदाज लावता येईल. ६५ रुपयांचे डिझेल ९२ रुपये केल्याने मालवाहतुकीचे दर वाढले. कर्ज काढून किंवा भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर चालवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना तारणार की मारणार याचा विचार केंद्रातील राज्यकर्त्यांनी करावा, असे डक म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन पाठवून भाववाढ कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी डक यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना ना जीवाची, ना मालाची हमी
एकीकडे आधीच कोरोना महामारीचे संकट असताना खतांचे भाव दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होईल. सरकारने कर्मचारी व अनेकांना कोविडयोद्धा पुरस्कार जाहीर केले, विमा कवच दिले, मात्र शेतकऱ्यांना कुठलीही सुरक्षा दिली नाही. बाजारभावाची कोणतीही हमी नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे, असे डक म्हणाले.