बीड : अंबाजोगाई तालुक्यात लोखंडी सावरगाव येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला असून त्यासह प्रतिबंधित क्षेत्रात निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमानुसार लोखंडी सावरगांव हे संक्रमित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. लोखंडी सावरगावपासून १ ते १० किलोमीटर.परिसरातील श्रीपतरायवाडी, वरपगांव, कोळकानडी , डिघोळअंबा, कोद्री सातेफळ, हिवराखुर्द,चनई, कुंबेफळ, माकेगांव, उमराई, कानडी बदन तसेच केज तालुक्यातील होळ, दिपेवडगांव,पळसखेडा, बोरीसावरगांब या गावांतील कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यास येत आहे. तसेच या बाबींसाठी वरील सर्व गावे ही सतर्क भाग म्हणून पुढील आदेशापर्यंत घोषित करण्यात आली आहेत, असे निर्देश राहुल रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांनी दिले आहेत.
आपल्या भागात १ किंवा २ कावळे मृत पावल्यास घाबरून जाऊ नये. मृत कावळे, कोंबड्या आढळून आल्यास ग्रामपंचायत नगरपंचायतशी व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा. मृत कावळ्यांना हाताने स्पर्श करू नये, मास्क वापरावा. तसेच सदरील भाग धुण्याच्या सोड्याने किंवा चुण्याने निर्जंतूक करुन घ्यावा. कावळ्यांमध्ये जास्त प्रमाणात असाधारण मृत्यू आढळल्यास रोग निदानासाठी त्यांचे नमुने पाठविण्यात येतील, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.