परळी (बीड ): शेजारील बिअर बार व हॉटेल मधील पाळीव कुत्री सतत भुंकतात म्हणून चक्क बंदुकीतून गोळी झाडून एका कुत्र्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ( दि 11) सकाळी १०. ३० वाजता येथील धर्मापुरी रोडवरील धारावती तांडा शिवार भागात घडली. या प्रकरणी निवृत्त कृषी अधिकारी रामराज घोळवे विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री आर्म ऍक्ट व प्राणी हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील धर्मापुरी रोडवर निवृत्त कृषी अधिकारी रामराज घोळवेची शेती आहे. या शेतीलगत केंद्रे यांचे बियर बार व हॉटेल आहे. सध्या हे हॉटेल विकास बनसोडे यांनी भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेले आहे. बनसोडे यांनी येथे तीन कुत्री पाळली आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मोकाट असलेली कुत्री घोळवे यांच्यावर भुंकत होती. यावरून संतापलेल्या घोळवे यांनी बंदूक हाती घेत कुत्र्यांचा पाठलाग केला. हॉटेलच्या पार्किंगमध्ये येऊन घोळवेनी कुत्र्यांच्या दिशेने गोळीबार केला. यात एका कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. तर एक कुत्रा जखमी अवस्थेत शिवारातील शेतात पळून गेला असल्याची माहिती आहे. याबाबत परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हॉटेलचे चालक विकास बनसोडे यांनी तक्रार दिली आहे. यावरून रामराज घोळवेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे हे करत आहेत.
परळीत कुत्र्यांची दहशत, नागरिक त्रस्तशहरातील पद्मावती गल्ली व इतर काही भागात कुत्र्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कुत्र्यांना पाहून नागरिक घाबरत आहेत. शहरातील नेहरू चौक, जिजामाता उद्यान रोड, पद्मावती गल्ली ,पंचवटी नगर या भागात व अन्य ठिकाणी कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून येणे- जाणे करावे लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे त्यामुळे कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षकाकडेही काही लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु यावर नगरपालिका काही करू शकत नाही असे उत्तर देण्यात येत आहे.