शिरूर कासार : बीड पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी १९ जानेवारी रोजी येथील पोलीस स्थानकाला भेट दिली. तालुक्यातील पोलीस पाटलांबरोबर संवाद साधला. आपल्या काही अडचणी असल्यास निःसंकोचपणे सांगत चला, असेही त्यांनी सांगितले. भेटीदरम्यान सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कारदेखील केला.
पोलीस पाटील हा पोलीस आणि गाव यांच्यात समन्वय साधण्यासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावत असतो. गाव पातळीवरील छोट्या मोठ्या घटना पाटील पोलिसांना सांगत असतो, जेणेकरून पोलिसांना काम करताना हक्काचा माणूस पाटीलच मानला जातो. पाटलांशी संवाद साधताना आपण सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम केले पाहिजे, शिवाय लहानमोठ्या घटनादेखील सांगणे जरूरी असते. जेणेकरून पोलिसांना पुढील काम करताना सोपे ठरते, असे ते म्हणाले.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील दत्ता वीर (सव्वसवाडी), मधुकर मुळे (वडळी), मधुकर भोसले (तरडगव्हन), सुधाकर राऊत (हिवरसिंगा ), जुबेर पठाण (मानुर), लिंबा इंगळे, सुधाकर कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी आभार मानले.