बीड : जिल्ह्यातील सहा मतदारसंघात उमेदवारांची संख्या यावेळी वाढली आहे. कुठे दुरंगी, तर कुठे पंचरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. बीड मतदारसंघातून क्षीरसागर काकाने माघार घेतल्याने दोन भावंडांत लढत होणार आहे. तसेच परळीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना मराठा कार्ड म्हणून दिलेल्या राजेसाहेब देशमुख यांचे आव्हान असेल. अनेक ठिकाणी बंडखोरांनी दंड थोपटले आहेत.
जिल्ह्यात परळी, आष्टी, माजलगाव, केज, बीड आणि गेवराई असे सहा मतदारसंघ आहेत. बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी म्हणजेच काका आणि दोन पुतण्यांनी अर्ज भरले होते. सोमवारी ऐनवेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता डॉ. योगेश क्षीरसागर आणि आ. संदीप क्षीरसागर या दोन चुलत भावांमध्ये लढत होणार आहे. येथे आघाडीकडून डॉ. ज्योती मेटे, तर युतीतकडून शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बंड केले आहे. परळीत शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांनी अर्ज मागे घेतल्याने धनंजय मुंडेंना राजेसाहेब देशमुख यांचे आव्हान असेल. माजलगावातही आघाडीत शरद पवार गटाचे रमेश आडसकर आणि युतीत भाजपचे बाबरी मुंडे यांनी बंड केला आहे. आष्टीत भाजपचे माजी आ. भीमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर युतीकडून भाजपचे सुरेश धस आणि अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होईल. गेवराईत आघाडी आणि युतीतील काका - पुतण्याला अपक्ष असलेल्या लक्ष्मण पवारांचे आव्हान असेल. केजमध्ये दुरंगी लढत होईल.
दोन ठिकाणी नात्यात लढतबीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर या दोन चुलत भावांमध्ये लढत होत आहे. गेवराईत बदामराव पंडित आणि विजयसिंह पंडित या काका-पुतण्यात लढत होणार आहे. दोन्ही मतदारसंघात अपक्षांचीही गर्दी आहे.