केज : श्रावण सोमवारी हनुमंत पिंपरी येथील उत्रेश्वराच्या दर्शनास गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरीस गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच केज पोलिसांनी सोनसाखळी चोराचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. सोन्याची साखळी न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकास परत केली.
तालुक्यातील हनुमंत पिंपरी येथे उत्रेश्वरच्या दर्शनासाठी २३ ऑगस्ट रोजी बाबासाहेब बिक्कड जात होते. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी एका चोराने अलगद काढून घेतली. याबाबत बाबासाहेब बिक्कड यांनी केज पोलिसांत तक्रार दिली. प्रभारी ठाणेप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून त्याने चोरलेली सोन्याची साखळी हस्तगत केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने चोरीस गेलेली सोन्याची साखळी बाबासाहेब बिक्कड यांना परत करण्यात आली.