माजलगाव : मागील महिन्यात माजलगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी आणि सिंदफणा या दोन्ही नद्यांना पाणी सोडलेले असल्यामुळे काही काळ थंड बस्त्यात बसलेल्या व नवीन तहसीलदार येताच वाळूमाफियांनी पाणी असताना मोठ्या प्रमाणावर उपसा करत पुन्हा डोके वर काढले असून, तालुक्यातील विविध रस्त्यावरुन धावणारे वाळूचे हायवा सर्वसामान्यांना दिसुन येतात पण प्रशासनाला मात्र दिसून येत नाहीत तर वाळूच्या धंद्यात राजकीय लोकांचा देखील हस्तक्षेप वाढल्यामुळे महसूल व राजकीय वरदहस्तामुळेच वाळूमाफियांचा धुडगूस सुरु झाला असल्याने वरिष्ठ पातळीवरुन याची दखल घेण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
तालुक्यात मागील आठ ते दहा महिन्यांच्या काळात कुठेही वाळुचे टेंडर झालेले नाही. परंतु वाळू उपसा मात्र सर्रास होतो. तत्कालीन तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी स्वत: कार्यवाहीचा वारु फिरवत अनेक कारवाया केल्या व वाळू माफियांना धाक बसविला. दीड ते दोन महिन्यांपासून पैठणच्या नाथसागरातून गोदावरी नदीत तसेच माजलगाव धरणातून सिंदफणा नदीत पाणी सोडल्यामुळे वाळू असणारी ठिकाणे पाण्यात गेल्यामुळे वाळू माफिया थंड पडलेले होते. परंतु आता या दोन्ही नद्यांमध्ये पाणी असताना देखील महसूल खात्यातील अधिकारी यांच्याशी हातमिळवणी करत भरमसाठ वाळू उपशाला सुरुवात केली आहे.
गोदावरीला सोडलेल्या पाण्यामुळे वरच्या भागातून मोठ्या प्रमाणात वाळू ही हिवरा, कवडगाव, रिधोरी, काळेगाव, डुब्बाथडी, सादोळा, बोरगाव, आबेगाव, आडोळा, शु.ति.लिमगाव, मोगरा तसेच सिंदफणा नदी काठच्या चिंचोली, डेपेगाव इ. ठिकाणच्या पात्रात आलेली आहे. यातील अनेक गावांमधील वाळूचे टेंडर यापूर्वी झालेले असल्याने रस्त्यांची व्यवस्था या आगोदरच करण्यात आलेली असल्याने वाळूचोरांचे चांगलेच फावत आहे. वाहून आलेली वाळू सुरुवातीला पात्रातून काढून ती पात्रानजीकच्या शेतामध्ये आणून ठेवली जाते व नंतर मागणीनुसार रातोरात गायब केली जाते. येथील संबंधित गावंचे तलाठी, मंडळाधिकारी यांना ही बाब महित असून, देखील वाळूमाफियांशी या लोकांचे लागेबांधे असल्यामुळे जोपर्यत वरिष्ठ लक्ष देत नाहीत, तोपर्यंत यांची चांदी चालू राहते. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार येथे पहावयास मिळत आहे. मुरुम चोरीचे देखील प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असून येथील तहसीलमार्फत पाच पन्नास ब्रास मुरुमाची रॉयल्टी भरुन चार पाचशे ब्रास मुरुमाचा उपसा केल्या जात आहे. याला देखील महसूल विभागाचा आशीर्वादच आहे. वाळू आणि मुरुम चोरीच्या प्रकारात येथील राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप वाढविला आहे.
केनीच्या साह्याने केला जातो उपसागोदावरी पात्रात काही ठिकाणी पाणी असल्याने टँकटरच्या मोठ्या केनीचा वापर करुन ही वाळू काठावर ओढली जाते. एका वेळेस एक ब्रासच्या जवळपास वाळू या केनीने ओढली जाते.ती वाळू टॅक्टरने वरती आणली जावून हायवाद्वारे वाहतूक करुन या हायवा ४० ते ५० हजाराला ग्राहकाला विकली जाते.
कडक कारवाई करण्यात येईल वाळू माफियांनी जर बेकायदेशीर वाळू उपसा केला असेल तर पाहणी करुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यासाठी वाळू माफियांनी नियमाप्रमाणे वाळू उपसा करावा. गैरप्रकार निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.- वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव