सोमनाथ खताळबीड : मारहाण केलेल्या जखमी रिक्शाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून निषेध नोंदवला. यामुळे येथे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दत्ता दिनकर उबाळे (वय २५ रा.चऱ्हाटा ता.बीड) असे मयताचे नाव आहे. दत्ता हा रिक्षााचालक आहे. १ मे रोजी सकाळी त्याचा आणि इमामपूर (ता.बीड) येथील काही तरूणांचा वाद झाला होता. यात त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर रात्री ११ वाजता त्याला रिक्षासहित चऱ्हाटा गावाजवळ आणून टाकण्यात आले. नातेवाईकांनी त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी याचा अहवाल बीड ग्रामीण पोलिसांनाही दिला. परंतु गुन्हा दाखल झाला नव्हता. आज गुरूवारी रात्री ८ वाजता दत्ताचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी आक्रमक होत रात्री साडे नऊ वाजता जिल्हा रूग्णालयात गर्दी करत ठिय्या मांडला. तसेच जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्राही त्यांनी घेतला. रात्री १० वाजेपर्यंत सर्व नातेवाईक रूग्णालयातच होते.
या प्रकरणाची माहिती घेत आहोत. संशयितांना ताब्यात घेण्यासह इतर काही चौकशी केली जाईल. त्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाणार आहे. आम्ही याच प्रकरणात आहोत.
संतोष साबळे, पोलिस निरीक्षक, ग्रामीण पोलिस ठाणे बीड