बीड: डिझेलमध्ये होणाऱ्या सततच्या दरवाढीचा फायदा घेत रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अक्षरश: अडवणूक सुरू आहे. कधी राईट, कधी लेफ्ट करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रिक्षा पळवल्या जातात. शिवाय प्रवासी मिळविण्यावरूनही भररस्त्यात रस्सीखेच सुरू असते. यामुळे प्रवाशांना नाहकच मनस्ताप सहन करावा लागतो.
शहरातील एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठीचे अंतर अवघे दोन किलोमीटर असले तरी शंभर रुपये मोजल्याशिवाय रिक्षा जागची हलत नाही. जिल्ह्यातील इतर शहरांतही याहून वेगळी परिस्थिती नाही. प्रवाशांची बॅग हिसकावून घेत आपल्याच रिक्षात बसण्याचा आग्रह केला जातो. यामुळे काही वेळा वादावादीचे प्रसंगही उद्भवतात. वाहतूक नियमांचा रिक्षाचालकांना विसर असतो. विनापरवाना रिक्षाचालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची अडवणूक होत असल्याचे पाहावयास मिळते.
....
या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी
बसस्थानक : येथून शहराच्या कुठल्याही टोकाला जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागते. काहीवेळा भाडे न ठरवता प्रवाशांना रिक्षात बसवतात व नंतर जास्तीचे भाडे वसूल करतात. अनेकजण हा फंडा वापरतात.
...
आण्णाभाऊ साठे चौक : येथे ऑटोरिक्षा व ॲपेरिक्षांची गर्दी असते. भररस्त्यात वाहने उभी करून प्रवाशांची चढउतार केली जाते. प्रवाशी मिळविण्यासाठी रिक्षाचालकांत अक्षरश: झोंबाझोंबी होते. काहीवेळा वादावादीचे प्रसंग उद्भवतात.
बार्शी नाका:
येेथे विद्यार्थी, कामगार मोठ्या प्रमाणात असतात. त्यांच्याकडून जादा भाडे वसूल केले जाते. मनाजोगे भाडे ठरत नाही तोपर्यंत एकही रिक्षा जागची हलत नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहकच भुर्दंड सोसावा लागत आहे.
.....
प्रवाशांना त्रास
शहरात तर जादा भाडे घेतातच ,पण ॲपे रिक्षावालेही शहराजवळच्या गावांना जाण्यासाठी बसपेक्षा दुप्पट भाडे वसूल करतात. इंधन दरवाढ झाल्याची कारणे देत मनमानी पद्धतीने भाडे घेतले जाते.
- नारायण गरड, प्रवासी
....
दाेन किलोमीटरवर जाण्यासाठी शंभर रुपयांची मागणी करतात. शंभर रुपये देऊन रिक्षा भाड्याने केल्यानंतर त्या रस्त्यावरील प्रवाशांना कोंबले जाते. कोरोनासारख्या संकटातही दाटीवाटीने प्रवास करावा लागतो.
- श्रीमंत देशमुख, प्रवासी
.....
मनमानी भाडे
१) बसस्थानक ते एकनाथनगर येथे जाण्यासाठी शंभर रुपयांचे भाडे मागतात.
२) बसस्थानक ते एमआयडीसी शंभर ते दीडशे रुपये इतके भाडे घेतात.
३) बसस्थानकापासून नाळवंडी नाक्यावर जाण्यासाठी दीडशे रुपये लागतात.
४) नाळवंडी नाका ते बसस्थानक ७० ते शंभर रुपयांचे भाडे द्यावे लागते.
...
तक्रार आल्यास कारवाई करणार
परवानाधारक रिक्षाचालकांचे प्रत्येक शहरातील भाडे वेगवेगळे असते. त्या- त्या ठिकाणच्या एआरटीओंकडून हे दर निश्चित होतात. बीडमध्ये अशा पद्धतीने मनमानी भाडे वसूल करून प्रवाशांची अडवणूक होत असेल तर तक्रारी कराव्यात. कायदेशीर कारवाई केली जाईल.
- भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, बीड.
...........
; ' ? !