लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : रस्त्यावर पडलेला दगड चुकवताना रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला. हा अपघात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयासमोर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाला.
गोपाळ सत्यवान घाडगे (वय १९, रा. खरोळा, ता. रेणापूर, ह.मु. राधानगरी अंबाजोगाई) असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास तो रिक्षा (एमएच ४४ - ४१६८) घेऊन भरधाव वेगाने भगवानबाबा चौकाकडे जात होता. एसआरटी महाविद्यालयासमोर रस्त्यावर मोठा दगड पडलेला दिसून आल्याने त्याने अचानक ब्रेक दाबला.
यामुळे रिक्षावरील ताबा सुटून तो पलटी झाला आणि गोपाळ त्याखाली दबला गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून रिक्षाखाली दबलेल्या गोपाळला बाहेर काढून उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. त्यानंतर नातेवाईकांनी गर्दी केली.याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
अपघातात एक ठार; एक जखमी
सिरसदेवी : गेवराई तालुक्यातील कल्याण -विशाखापट्टणम २२२ हायवे शिरसदेवीपासून १ कि.मी. अंतरावर सिमेंट क्राँकिटसाठीचा टँकर (क्र. टीएप२१/एपी ८९०३) जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पलटी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात उद्धव साहेबराव नाईक (वय २२, रा. साडेगाव जि. परभणी) हे जागीच ठार झाले. तर मनोहर सोनाबा नाईक हे जखमी झाले. त्या बाजूला शिरसदेवी येथील शेतकरी विष्णू मंचरे यांच्या घरासमोरील दोन बैल बचावले. मनोहर नाईक यांना माजलगाव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.