....
लॉकडाऊनच्या नियमांना तिलांजली
वडवणी : शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे, तर कधी वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लादले असून, सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना मुभा दिली जात आहे, परंतु ११ नंतरही शहरातील रस्त्यांवर नागरिकांची भाजीपाला, फळ विक्रेते यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
....
लॉकडाऊनचा टरबूज उत्पादकांना फटका
वडवणी : यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी टरबुजाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले, शिवाय उत्पादनही भरपूर मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने विक्रीअभावी उत्पादकांना फटका बसला आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या टरबुजाला ज्यूस सेंटर, सार्वजनिक मोठे कार्यक्रम, लग्नकार्य या ठिकाणी मोठी मागणी असते, परंतु लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ, ज्यूस सेंटर, विविध कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे मागणी घटली आहे. त्यामुळे मामला चिचोटी साळीबा, देवडी, लिमगाव काडीवडगाव परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
....
दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी
वडवणी : शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणचे दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. त्यामुळे चालकांची गैरसोय होत आहे. वळण, नदी, पूल, अपघात प्रणव क्षेत्रातील रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन, प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
....
कमी दाबाने वीजपुरवठा
वडवणी : शहरासह ग्रामीण भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. यामुळे सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. खंडित वीजपुरवठ्यामुळे वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, शिवाय शेतकऱ्यांनाही फळपिकांना पाणी देताना विजेची वाट पाहावी लागते. तरी शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.