बीड : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रविवारी एकाच दिवसात तब्बल २६० नवे रुग्ण आढळले. यात बीडमधील १२३ तर अंबाजोगाईतील ५२ रुग्णांचा समावेश आहे. तसेच ९९ कोरोनामुक्त झाले, तर एकाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील नव्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात रोज १५० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. रविवारी तर चालू वर्षातील विक्रमी आकडा ओलांडला. रविवारी दिवसभरात दोन हजार ६४१ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील २३८१ अहवाल निगेटिव्ह आले, तर २६० पॉझिटिव्ह आले. यात बीड तालुक्यात सर्वाधिक १२३ रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ अंबाजोगाई ५२, आष्टी १५, धारूर २, गेवराई ९, केज १५, माजलगाव १९, परळी १३, पाटोदा ५, शिरूर ५ आणि वडवणीतील दोघांचा समावेश आहे. तसेच ९९ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बीड तालुक्यातील अंजनवती येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे जीव गेला. याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. आता एकूण बाधितांची संख्या २० हजार ४२७ एवढी झाली आहे. यापैकी १८ हजार ९८४ कोरोनामुक्त झाले असून ५९० जणांचा बळी गेला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, साथरोग अधिकारी डॉ. पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुक्तीचा टक्का घसरला
मागील आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. तर, दुसऱ्या बाजूला कोरोनामुक्त होणारे खूपच कमी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा टक्का ९५ वरून ९२ वर आला आहे. टक्का घसरल्याने चिंता व्यक्त होत आहे.