पुरूषोत्तम करवा
माजलगाव : कोरोनातील बरे झालेल्या रुग्णांना अचानक डोके दुखणे, डोळा सुजणे, डोळा दुखणे, नजर कमी होणे, उबळ येणे, नाकातील श्वास कोंडणे, दात हालणे, दात दुखणे ही लक्षणे दिसून आलेली अनेक रुग्ण माजलगावात आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात बुरशीजन्य जंतूचा संसर्ग म्हणजेच फंगल इन्फेक्शन होऊ लागले आहे ते म्हणजे म्युकरमायकोसीस. कोरोनानंतर रुग्णाची कमी झालेली प्रतिकारशक्ती सोबतच अनियंत्रित मधुमेह हे याचे मुख्य कारण आहे. नाकातून सायनसव्दारे संक्रमण सुरू होते पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळे व मेंदुपर्यंत पोहचते. डोळा कायमचा निकामी होतो, अर्धांगवायू व मृत्यू ओढावतो हा आजार अत्यंत गंभीर असून याचा मृत्युदर ६० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची लक्षणे डोके दुखणे, नाक दुुुखणे, वरच्या पापणीला सूज येणे, पापणी खाली येणे, डोळा पुढे आल्यासारख वाटणे, डोळ्याची हालचाल मंदावणे, वस्तू दोन-दोन दिसणे, डोक्याभोवती त्वचा काळसर होणे ही लक्षणे आहेत. म्युकरमायकोसिसचे निदान अत्यंत अवघड असते. डोके, सायनस व मेंदूचा एमआरआय स्कॅन करावा लागतो. नाक, कान, घसा तज्ज्ञांकडून नाकातील द्रव्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी लागते. या आजाराचे उपचार अत्यंत खर्चिक असतात. महागड्या इंजेक्शन सोबतच सर्जरीची गरज पडते. त्यासाठी डोळ्याचे, नाक, कान, घसा, दाताचे तज्ञ, शल्यचिकित्सक, मेंदुविकारतज्ज्ञांची टीम लागते. या घातक आजाराचा मृत्युदर ६० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
माजलगावात पाच रुग्ण आढळले
माजलगाव शहर व तालुक्यात मागील १५-२० दिवसात कोरोनानंतर त्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे दिसून आले. त्यातील तीन रुग्णांची दृष्टी अत्यंत कमी झाली. तर एकाला दोन आकृती दिसत असल्याची माहिती डोळ्याचे डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली. तर एक रुग्णाच्या तोंडात काळे डाग दिसून आले. त्या ठिकाणी सुज येऊन पू येत असल्याची माहिती दंतवैद्यक डॉ. सचिन देशमुख यांनी दिली. या सर्वांना पुढील उपचारासाठी दुसरीकडे पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले असेल व ज्या पाॅझिटिव्ह रुग्णास शुगर आहे तसेच याकाळात थायरॉईडचे इंजेक्शन घेतली आहेत, त्यांनी काळजी घेणे अत्यंत जरूरी असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
रुग्णांनी घाबरून न जाता रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवावी. मधुमेहींनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी व लक्षणे आढळल्यास डोळ्याच्या, नाकाच्या किंवा दंतरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. माझ्या मागील वीस वर्षाच्या काळातील रुग्णसेवेत यापूर्वी केवळ एक रुग्ण पाहिला होता तर मागील १५-२० दिवसात पाच संशयित रुग्ण आढळले असून त्यांना पुढील उपचाराकरिता इतर ठिकाणी पाठवण्यात आले.
-- डाॅ. स्वानंद कुलकर्णी, नेत्रतज्ज्ञ माजलगाव
===Photopath===
080521\purusttam karva_img-20210506-wa0048_14.jpg~080521\purusttam karva_img-20210506-wa0046_14.jpg