- दीपक नाईकवाडेकेज ( बीड ): रोडरोमिओच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या पित्याचा आज सकाळी उपचारादरम्यान लातूर येथे मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्य आरोपी भागवत चाटे आणि त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करण्याची मागणी करत संतप्त नातेवाईकांनी रमेश नेहरकर यांचा मृतदेह केज पोलिस ठाण्यात आणत ठिय्या दिला आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यातून हलवणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
सोशल मीडियात फोटो व्हायरल केल्याचा जाब विचारताच रोडरोमिओ भागवत चाटे याने अल्पवयीन मुलीच्या पित्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शनिवारी दुपारी दोन साथीदारांच्या मदतीने पाठलाग करून हल्ला केला होता. आज हल्ल्यात गंभीर जखमी पित्याचा लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या अटकेची मागणी करत नेहरकर यांचा मृतदेह दुपारी केज पोलिस ठाण्यात आणून ठेवत ठिय्या सुरु केला आहे. मागील तीन तासांपासून नातेवाईक पोलीस ठाण्यात आहेत. आरोपींच्या अटकेनंतरच मृतदेह पोलीस ठाण्यातून हलवून अंत्यसंस्कार करू या मागणीवर नातेवाईक असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. याची माहिती मिळताच सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी मृताच्या नातेवाईकांशी चर्चा केली. आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले तरीही नातेवाईक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.