धारूर : खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर अरणवाडी येथे साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. या तलावातून जाणारा पाचशे मीटरचा रस्ता उंच करण्यात येत आहे. मागील चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. या पावसात चार ठिकाणी रस्ता खचल्याने मोठे भगदाड पडले आहेत. यावरून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात धोका होऊ शकतो.
खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग धारूर येथील घाटातून जात आहे. घाटालगत अरणवाडी साठवण तलावाबाहेरून रस्ता काढण्यात आला आहे. रस्त्याचा पाचशे फूट अंतराचा भाग हा तलावात येत आहे. तलावाची धार कोंडल्यास या रस्त्यावर भविष्यात पाणी येण्याची शक्यता असल्याने मागील काही महिन्यांपासून रस्त्याची उंची वाढविण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले होते. रस्त्यावर मुरूम टाकून उंची वाढविली आहे. उंची वाढवितांना काही भागात अरूंद जागेत मुरूम टाकण्यात आला होता. रस्त्यावर मुरुम टाकल्यानंतर मागील अनेक महिन्यांपासून काम बंद होते. काही ठिकाणी रूंद तर काही ठिकाणी अगदी अरूंद असे काम केले आहे.
ऐन वळणाच्या ठिकाणी रस्ता अरूंद केल्याने भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होणार होता. तलावाचे पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून रस्त्याची उंची वाढविली. परंतु वळणाच्या ठिकाणी रस्ता रूंद करण्याची गरज होती. यामुळे दोन वाहने जाण्यास अडचण येणार आहे. तलावातून जाणारा हा रस्ता अरूंद असल्याने भविष्यात धोक्याचा ठरणार आहे.
अरूंद आणि त्यातच अवकाळीच्या पहिल्याच पावसामुळे दोन ते तीन ठिकाणी हा रस्ता खचून गेला होता. त्यावर गुत्तेदाराने खचलेल्या जागी मुरूम टाकला आहे. तेथे दहा पंधरा दिवसांपूर्वी कोरडी खडी टाकली असून ती रस्त्यावर पसरवली आहे. त्यावर मुरूम अथवा डांबरही टाकलेले नाही. खडी टाकल्यानंतर त्यावर काहीच न करता गुत्तेदार मात्र पसार झालेला आहे.
त्यातच मागील चार दिवसांपूर्वी अवकाळीचा दुसरा पाऊस झाला. या पावसामध्ये चार ठिकाणी रस्त्याचा भराव खचून पुन्हा मोठे भगदाड पडल्याने भविष्यात या रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. यामुळे हे काम हे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर येत आहे.
रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करून घेऊ
धारूर घाटाखाली सुरू असलेले रस्त्याचे काम हे चांगल्या दर्जाचे करून घेण्यात येईल. आलेल्या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ पाहणी करून संबंधित गुत्तेदारास कडक सूचना देऊन कामात तत्काळ बदल केला जाईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता विक्रम जाधव यांनी सांगितले.
===Photopath===
150521\anil mhajan_img-20210515-wa0035_14.jpg