अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ७८ हजार हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ५९ हजार २३० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झालेला आहे, तर अंबाजोगाई तालुक्यात दरवर्षी सरासरी ७०५ मि. मी. पाऊस पडतो. मात्र, गेल्या ४ महिन्यातच ८३० मि. मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी तालुक्यातील सर्वच महसूल मंडलात पावसाची मोठी नोंद आहे.
गेल्या तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मांजरा, वाण व रेणा या तीन नद्या अंबाजोगाई तालुक्यातून वाहतात. पावसामुळे या नद्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले. हे पाणी अनेकांच्या शेतात गेल्याने पिके वाहून गेली. शेतात जाण्यासाठी जे रस्ते होते, त्यांचीही पावसामुळे मोठी दुरवस्था झाली आहे.
..
अंबाजोगाई तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. कृषी सहाय्यक व महसूलचे कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करतील. पंचनामे पूर्ण होताच नुकसानीचा आम्ही अहवाल शासनाला कळणार आहोत.
-विपीन पाटील, तहसीलदार, अंबाजोगाई
...
गेल्या महिनाभरापासून मोठा पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्यात सडू लागली आहेत, तर शेतात जाण्यासाठी रस्ताही राहिला नाही. असा पाऊस पूर्वी २० वर्षात झाला नव्हता.
-महेश गौरशेटे, शेतकरी.