माजलगाव : शहरात दोन वर्षापूर्वी करण्यात आलेला सिमेंट रस्ता व नाली बांधकाम निकृष्ट झाल्याचा परिणाम व्यापाऱ्यांना आता भोगावा लागत आहे. दोन दिवसात झालेल्या पावसाचे पाणी गटारीत जात नसल्याने ते मुख्य रस्त्यासह मोंढ्यातील अनेक दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.
खामगाव - पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी माजलगाव शहरातून गेला. या सिमेंट रस्त्याचे काम मागील दोन वर्षापूर्वी पूर्ण झाले होते. या रस्त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे संबंधित गुत्तेदाराने हा रस्ता व गटारीचे काम थातूरमातूर केले. कोठे पूल उंच करून ठेवले तर अनेक ठिकाणी नाल्याच जोडल्या नाही. त्यामुळे काही ठिकाणचे काम न करताच संबंधित गुत्तेदार अर्धवट सोडून निघून गेला. या झालेल्या निकृष्ट कामाचा परिणाम मात्र आता दिसून येत आहे.
रस्त्यापेक्षा पूल व नाल्या उंच केल्याने मोंढ्यातून आंबेडकर चौकात जाणाऱ्या रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी साचले तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. मुख्य रस्त्यावरील पाणी नालीत जाण्यासाठी उतार नसल्याने शिवाजी चौक ते आंबेडकर चौकापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी साचून नदीचे स्वरूप आले होते. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले.
कोणीच बोलायला तयार नाही
काम सुरू असताना संबंधित ठेकेदार शहरातील नाली व रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट करीत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा खा. डॉ. प्रीतम मुंडे व आ. आर. टी. देशमुख यांच्याकडे केल्या होत्या. परंतु त्यांनी दखल न घेतल्याने विधानसभा निवडणुकीत शहरात भाजपला मोठा फटका बसला होता.
त्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी संभाजी चौकात संबंधित विभागाचा गुत्तेदार व अभियंत्यांना बोलावून नाल्या व्यवस्थित करण्यास सांगितले होते. यावेळी शहरातील सर्वच व्यापारी उपस्थित होते. आमदारांनी सांगूनही संबंधित अभियंता व गुत्तेदाराने कसल्याही प्रकारची दखल अद्याप घेतलेली नाही.
आम्ही व्यापाऱ्यांनी अनेक वेळा संबंधित अभियंत्यांना अनेक वेळा भेटून होत असलेल्या निकृष्ट नाली व रोडच्या कामाबाबत लेखी व तोंडी तक्रारी करूनही संबंधित ठेकेदाराने अनेक ठिकाणी पूल उंच करून ठेवले. त्यामुळे मोंढ्यामध्ये माल घेऊन येणाऱ्या मोठ्या वाहनांना अडचण निर्माण होत आहे. पावसाळा सुरू होताच मोंढ्यात व मुख्य रस्त्यावर अनेक दुकानात पाणी जाते. याची संबंधित विभागाने दखल न घेतल्यास व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. - सुरेंद्र रेदासणी ,अध्यक्ष, तालुका व्यापारी संघटना
===Photopath===
040621\img-20210604-wa0113_14.jpg~040621\img-20210604-wa0115_14.jpg