अंबाजोगाई (बीड ) : रमजान ईद आणि रविवार अशी सलग दोन दिवसांची सुट्टी आल्यामुळे अंबाजोगाई येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील रोखपाल जय पवार हे बाहेरगावी गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा उठवत चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडत आतील 72 हजार रूपयांच्या सामानाची चोरी करून पोबारा केला. पोलिसांनी घटनेनंतर ४८ तासाच्या आत सदरील चारचाकीचा शोध घेऊन तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
अंबाजोगाई येथील बँक ऑफ इंडियाचे रोखपाल अजय श्रीराम पवार (रा.सोनखेड तांडा ता.सोनपेठ जि.परभणी) हे सध्या गित्ता रोडवरील नारायण पार्कच्या सी.3 बंगल्यामध्ये किरायाने राहतात. दि. 16 व 17 जून रोजी रमजान ईद व रविवारच्या सुट्टीमुळे पवार हे आपल्या गावी शुक्रवारचे कामकाज पुर्ण करून गेले होते. घरामध्ये कोणी नसल्याची संधी साधून इंडिका (एमएच 12 एफझेड 1019) कारमधून आलेल्या चोरट्यांनी शुक्रवारी (दि. १५ ) पहाटे पवार यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दागदागिने,रोख रक्कम आणि काही सामान असा 72 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास करून पोबारा केला.
या चोरीची माहिती शेजार्याने पवार यांना मोबाईलवर दिल्यानंतर त्यांनी आपल्या घरी येऊन चोरीची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानंतर 18 जून रोजी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तपास करत तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर अधिक तपशिलाने माहिती मिळू शकेल. या प्रकरणाचा तपास पुढील सहा. पोलिस निरिक्षक मारोती मुंडे करीत आहे.