लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. अशातच खाजगी रुग्णवाहिका चालक सामान्यांची अडवणूक करून लूट करीत आहेत. ऑक्सिजन असलेल्या रुग्णवाहिकांमधून शहरांतर्गत अवघ्या एका किलोमीटरसाठी अडीच ते तीन हजार रुपये घेतले जात आहेत. आपत्ती काळात सामान्यांची लूट होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात शासकीय रुग्णवाहिकांची संख्या ७२ असली तरी त्यातील केवळ १०८ रुग्णवाहिकांमध्येच ऑक्सिजनची सुविधा आहे. त्यातीलही काही रुग्णवाहिकांमधील ऑक्सिजन यंत्रणा बंद असल्याचे सांगण्यात येते, तर खाजगी रुग्णवाहिकेत ऑक्सिजन असल्याने त्यांच्याकडून अडवणूक केेेली जात आहे. सध्या कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने आणि ज्येष्ठांना अधिक धोका असल्याने या रुग्णवाहिकांची मागणी आहे.
औरंगाबादसाठी २२ हजार रुपये : बीडमधील एखादा रुग्ण औरंगाबादच्या रुग्णालयात न्यायचा असेल तर खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून तब्बल २० ते २२ हजार रुपये भाडे घेतले जात आहे. पूर्वी ५ ते ८ हजार रुपयांत औरंगाबादला रुग्ण नेला जात होता.
सिव्हिल ते जालना रोडपर्यंत
जिल्हा रुग्णालयातून जालना रोडवरील एका खाजगी रुग्णालयात नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका चालकाने तब्बल ३ हजार रुपये घेतले. एकच रुग्णवाहिका असल्याने नातेवाइकांचा नाइलाज होता.
बीड ते नेकनूरसाठी
जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित असलेल्या व्यक्तीचा मृतदेह नेण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकेने तब्बल ११ हजार रुपये घेतले. ऑक्सिजन नसतानाही केवळ मृतदेह नेण्यासाठी एवढी मोठी रक्कम सामान्यांना मोजावी लागत आहे.
तक्रार कुठे करायची?
खाजगी रुग्णालयांवर तसे थेट कोणाचे नियंत्रण नाही; परंतु काही अडचण असल्यास आपण जिल्हाधिकारी अथवा जिल्हा शल्यचिकित्सक आणि ग्रामीणमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकतो. आरोग्य विभागाकडून याची चौकशी करून कारवाई होऊ शकते, असे सूत्रांकडून ‘लोकमत’ला सांगण्यात आले.
तक्रार करावी
सध्या आपत्तीची परिस्थिती आहे. अशा परिस्थिती सामान्यांची अडवणूक व लूट होत असेल तर चूक आहे. खाजगी रुग्णवाहिका असो वा सरकारी. सामान्यांना त्रास झाल्यास त्यांनी तात्काळ तक्रार करावी. यात चौकशी करून कारवाई केली जाईल.
- डॉ.आर.बी. पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
===Photopath===
210421\21_2_bed_12_21042021_14.jpeg
===Caption===
खाजगी रूग्णवाहिका