लोकमत न्यूज नेटवर्कशिरुरकासार : शुक्रवारी येथील नगर पंचायतच्या सभागृहात मतदान प्रक्रिया होऊन प्रथम नगराध्यक्ष राहिलेले रोहिदास गाडेकर पाटील यांची नगराध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी रुख्साना पठाण यांची निवड झाली.
सतरा नगरसेवकांच्या नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे दहा आणि त्यांच्याच गटाचा एक अपक्ष आल्याने न. प. च्या प्रथम सत्रात बहुमताने प्राबल्य होते. हे सर्व माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचेच शिलेदार होते. परंतु जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरच्या घडामोडीत पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून सुरेश धस यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचे पडसाद शिरुर कासारमध्ये उमटले.
नगराध्यक्ष रोहिदास पाटील यांनी पक्ष मोठा मानून राष्टÑवादीमध्ये राहणे पसंत केले. तर काहींनी धस यांचीच जवळीक कायम ठेवली. परिणामी बहुमतात असलेला पक्ष संख्याबळाने घटला. अशाही परिस्थितीत पाटील यांनी बाजी मारून दुसऱ्यांदा अध्यक्ष पदाचा मान मिळवला.
रोहिदास पाटील आणि रुख्साना पठाण यांनाही नऊ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी अध्यक्षपदाच्या उमेदवार मीरा दत्तात्रय गाडेकर पाटील व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश देसारडा यांना आठ मते मिळाल्याने एका मताने पराभूत व्हावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण धरमकर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून लक्ष्मण धस यांनी काम पाहिले. सपोनि महेश टाक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.