अविनाश मुडेगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई :
कोरोनाबाधितांच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगर परिषदेकडे आहे. अंत्यसंस्कार शासनाच्या वतीने होतात. कुटुंबीय व नातेवाइकांना मृतदेह सोपविला जात नाही. अशा स्थितीत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारीच पुढाकार घेऊन पुत्र व कुटुंबीयांची भूमिका निभावतात. गेल्या दहा महिन्यांत अंबाजोगाई नगर परिषदेने सर्वधर्मीय ५२५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
अंबाजोगाईत ३० जून रोजी पहिला कोरोनाचा बळी गेला. पहिल्या मृतदेहावर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. दुसऱ्यावेळी जेव्हा एकाच वेळी चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. त्यावेळी बोरूळ तलाव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरवासीयांचा मोठा विरोध झाला. नागरिकांच्या विरोधामुळे सर्व्हे नंबर-१७ मध्ये वेगळ्या स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आली. मुस्लीम समाजासाठी मुंडेपीर परिसरात दफनविधीची सोय करण्यात आली आहे.
अंबाजोगाईच्या स्वच्छता विभागाचे निरीक्षक रमेश सोनकांबळे, पथक प्रमुख रणधीर सोनवणे, लक्ष्मण जोगदंड, अनिकेत साठे, बाबूराव आवाडे, बाबासाहेब आवाडे, शेख जावेद हे कर्मचारी अंत्यविधीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांवर अंत्यविधीचीच जबाबदारी आहे. हे पथक जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत.
नातेवाईकांची रूखरूख होते कमी
कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना ते आपल्याच कुटुंबातील आहेत. या भावनेतून विधिवत अंत्यविधी करतात. रक्ताचे नाते असल्याच्या भावनेने अंत्यविधी पार पाडत असल्याने अंतरावर उभे राहून पाहणाऱ्या नातेवाईक व कुटुंबीयांच्या मनातील रुखरुख कमी होत आहे. कोरोनाबाधित व्यक्ती दगावल्यास रुग्णालय प्रशासन मृतदेह नगर परिषदेकडे सोपवते. पालिकेच्या वतीने मृतदेह शववाहिनीद्वारे स्मशानभूमीत आणण्यात येतो. तिथे अंत्यसंस्कार केले जातात.
काळजावर दगड अन मनाला वेदना
गेल्या दहा महिन्यांपासून कोरोनाच्या मयत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम आम्ही करत आहोत. हे काम कर्तव्य म्हणून पार पाडत आहोत; परंतु हे मृतदेह कोणाचे ना कोणाचे तरी आई, वडील, भाऊ, बहीण असतात. या अशा आजारामुळे नातेवाइकांना सर्व काही दुरूनच पाहावे लागते. तेव्हा आमच्याही मनाला खूप वेदना होतात. आम्हीसुद्धा हे काम काळजावर दगड ठेवून करतो.
-रणधीर सोनवणे,
पथकप्रमुख. ...
कुटुंब दुरावले
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे काम सुरू झाल्यापासून पत्नी, मुले रोज काळजी घेत जा, असे सांगतात. हे काम करताना आम्ही पूर्ण सुरक्षितता बाळगतो; परंतु रोजचे मृतदेह पाहून कुटुंबात सामील होण्याची भीती वाटते. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही कुटुंबापासून दुरावलो आहोत.
-लक्ष्मण जोगदंड, अंत्यसंस्कार करणारा कर्मचारी. ...
===Photopath===
300421\381020210425_175659_14.jpg