ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ५- घरी आणलेली फळे खाल्यानंतर त्याच्या बीया आणि टारफले कच-याच्या कुंडीत जाणे हे कोणत्याही घरातले साधारण चित्र. फारसे कोणी त्याअनुषंगाने सजग नसते. परंतु एका महिलेने यासंदर्भात जराशी जागरूकता दाखवली आणि त्यांच्या बंगल्यातील परसबागेत चक्क एक रोपवाटिकाच तयार झाली. पर्यावरण, वृक्षलागवड यावर केवळ त्या चर्चा करत बसल्या नाहीत तर त्यांनी स्वत: आपल्या घरात पर्यावरणाचे संतुलन कसे साधायचे हे दाखवून दिले.
कांता बबन फसले या हाडाच्या शिक्षिका. सध्या त्या अहमदनगरला बालाजी कॉलनीत राहतात. घरी मोसमी फळे आणली की त्याच्या बीया त्या काळजीपूर्वक गोळा करतात. या बीया प्लॅस्टीकच्या पिशवीत माती टाकून त्यात रूजवल्या जातात. आपल्या छोट्या नातवाच्या सोबत मग त्या याला पाणी देणे, निगा राखणे, हे काम घरी फावल्या वेळेत करतात. सहज म्हणून त्यांनी वर्षभरापूर्वी हे केले आणि दोन महिन्यात त्यांना पिशवीत बीज अकुंरताना दिसले. त्यानंतर मग त्यांनी आपल्या बागेत अशा बियांपासून छोटीशी रोपवाटिकाच तयार केली. यासंदर्भात त्या कधी कोणाशी बोलल्याही नाहीत.
हरतालिकाच्या निमित्ताने त्यांच्या शेजारीच राहणा-या संगीता विवेक जोशी ह्या पत्री आणण्यासाठी त्यांच्या घराच्या परसबागेत गेल्या आणि त्यावेळी त्यांना हे सगळ पाहण्यास मिळालं. त्यांनी आवर्जून लोकमतला ही माहिती कळविली आणि त्याचा एक व्हीडिंओही पाठविला. ऐरवी सोशल मीडियातून पावसाळ्यात अशा फळांच्या बीया प्रवासात तुमच्या सोबत ठेवा आणि त्या मोकळ्या जागेत टाका, असे मॅसेज फिरत असले तरी कांता फासले यांनी मात्र कोणाला मॅसेज देत बसण्याऐवजी स्वत: हे करून दाखविल्याने आता त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही