कडा : लाॅकडाऊन काळात तीस ते चाळीस रुपये किलोने भाव मिळत असल्याने आष्टी तालुक्यातील शेरी येथील शेतकऱ्याने तीस गुंठे शेतात कोबीचे पीक घेतले. भरघोस उत्पादन झाले, परंतु बाजारात कोबीला दोन ते तीन रुपये किलो भाव मिळत आहे. भाव परवडत नसल्याने चक्क कोबी पिकावर रोटर फिरविण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील शेतकरी व शिरापूर येथील शाळेवर असलेले शिक्षक बाळासाहेब महाडिक यांनी लाॅकडाऊन काळात कोबीला चांगला भाव मिळत असल्याने कोबी शेती करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तीस गुंठे शेतात घरीच रोपे तयार करून त्याची लागवड केली. चांगला भाव मिळेल, या आशेपोटी त्यांनी शेतात काबाडकष्ट केले. मात्र, भाज्यांच्या ठोक बाजारात मुबलक आवक होत असल्याने, चक्क दोन तीन रुपये किलो भाव मिळत आहे.
कोबीच्या शेतीवर १७ हजार रुपये खर्च आला. बाजारात भाव मिळत नसल्याने उत्पन्न केवळ चार हजार रुपयांचे झाले. कोबीच्या शेतात रोटर फिरवून या शेतकऱ्याने निराशा व्यक्त केली.
शेती करताना सध्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्याची तयारी असते, पण शेतीत पिकणाऱ्या मालाला पुरेसा भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल होत आहेत. या नुकसानीमुळे कोबीच्या शेतात रोटर फिरविला असल्याचे शेतकरी बाळासाहेब महाडिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
---
बाजारात कोबीला दोन ते तीन रुपये भाव मिळत असल्याने आष्टी तालुक्यातील शेतकऱ्याने रोटर फिरवित निराशा व्यक्त केली.
===Photopath===
220221\nitin kmble_img-20210222-wa0041_14.jpg~220221\20210222_124655_14.jpg