बीड : जिल्ह्यातील वाढती कोरोना चाचणी संख्या पाहता आता मोबाईल व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे. यात दररोज दोन हजार आरटीपीसीआर चाचणी करण्याची क्षमता असून, याला सोमवारपासून सुरुवातही झाली आहे. अगोदर जिल्ह्यातील सर्व स्वॅब हे अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठविले जात होते. आता या चाचण्या बीडमध्येच होणार असून, अंबाजोगाईचा ताण कमी होणार आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच कोरोना चाचण्याही लोक पुढे येत स्वत:हून करीत आहेत. आरटीपीसीआर चाचणींवर जास्त विश्वास असल्याने लोक याची चाचणी जास्त करतात. हे सर्व स्वॅब अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे त्यांच्यावर ताण येत होता. हाच धागा पकडून बीडमध्येही आरटपीसीआर चाचणी करणारी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याबाबत प्रस्ताव तयार केला आणि याला मंजुरीही मिळाली होती. परंतु, ती प्रयोगशाळा कार्यान्वित होईपर्यंत बीडमध्ये आयसीएमआर आणि एनआयव्ही यांच्यावतीने ही आरटीपीसीआर चाचणी करणारी व्हॅन बीडमध्ये पाठविण्यात आली आहे. या व्हॅनमधून दररोज दोन हजार चाचणी करण्याची क्षमता आहे. केवळ वीज आणि उभारण्यासाठी सुसज्ज जागा या व्हॅनला आवश्यक होती. आयटीआयच्या परिसरात ही व्हॅन उभी केली असून, तेथेच सर्व चाचण्या केल्या जाणार आहेत.
सीईओ, सीएस, डीएचओंची भेट
मोबाईल व्हॅनमधून सोमवारी कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली. याची पाहणी करण्यासह नियोजनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पवार यांनी भेट देत सूचना केल्या. यावेळी डॉ. सचिन आंधळकर, डॉ. सुधीर राऊत, डॉ. संतोष शहाणे, डॉ. जयश्री बांगर व मायलॅबचे कर्मचारी उपस्थित होते.
दोन दिवस उलटतपासणी
सोमवारी चाचण्यांना सुरुवात झाली असली तरी त्यांची उलट तपासणी केली जाणार आहे. अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेतील पॉझिटिव्ह आलेले स्वॅब आणि अँटिजन तपासणीतील पॉझिटिव्ह स्वॅब घेऊन त्यांची उलट तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक तीन ते चार तासाला अहवाल पाठविले जाणार आहेत.