बीड : मौजमस्ती करण्यासह दारू, सिगारेटचे व्यसन पूर्ण करण्यासाठी तरुण चोऱ्या करत आहेत. असाच काहीसा प्रकार रविवारी सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान घडला. दोन तरुण चाेरटे गुटखा खात आणि सिगारेटचा झुरका मारत जिल्हा रुग्णालयात आले. अवघ्या दीड मिनिटात त्यांनी मास्टर चावी लावून दुचाकी पळविली. पोलिसांना माहिती मिळताच तपास सुरू केला. परंतु वाढत्या चोऱ्यांमधून डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
क्षयरोग कार्यालयातील श्यामराव पवार यांची चिंचवण ग्रामीण रुग्णालयात पदोन्नतीवर बदली झाली. परंतु काही कामानिमित्त ते रविवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील प्रशासन विभागात आले. त्यांनी आपली दुचाकी (एमएच २३ एए ०३८५) पाठीमागील बाजूस असलेल्या किचनच्या समोर लावली. त्यांना कार्यालयातून येण्यास थोडा उशीर झाला. एवढ्यात दुचाकीवरून आलेल्या दोन तरुण चोरट्यांनी इकडे तिकडे पाहून गर्दीचा आढावा घेतला. त्यानंतर एका चोरट्याने सिगारेट पेटवीत झुरके मारले. तोपर्यंत दुसऱ्याने मास्टर चावी लावून लॉक उघडले. आपल्याकडे कोणी पाहत नाही, हे समजताच चोरट्यांनी दुचाकीवर बसून धूम ठोकली. हा सर्व प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बीड शहर पोलिसांनी चोरांच्या तपासासाठी पथके रवाना केली असली तरी सोमवारी रात्रीपर्यंत त्यांना चोरट्यांचा शोध लागला नव्हता. या प्रकरणात अद्यापही फिर्याद दाखल झालेली नाही.
जिल्हा रुग्णालयात चोरट्यांचा वावरजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून डॉक्टर, कर्मचारी आणि नातेवाईकांच्या दुचाकी चोरी जाण्याच्या घटना नवीन नाहीत. येथे पोलीस चौकी असून सुरक्षा रक्षकही असतात. परंतु त्यांचा कसलाच वचक नसल्याने चोरटे बिनधास्त फिरून दुचाकी पळवत असल्याचे दिसते. चोरी गेलेल्या दुचाकी शोधण्यातही पोलिस अयशस्वी ठरत आहेत. आता पुन्हा दुचाकी चोरी गेली आहे. यात चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला नसून त्यांचे चेहरे स्पष्ट ओळखायला येत आहेत. आता तरी पोलिसांना ते सापडतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.