बीड : मराठवाड्यात सर्वात जास्त भू-माफिया बीड जिल्ह्यात आहेत. तसेच वाळूमाफिया, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग यातही करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचारास सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही जबाबदार असल्याचा आरोप बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पाेटभरे यांनी केला आहे. मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कोरोना काळात सामान्यांची आर्थिक लूट करणाऱ्या डॉक्टरांवरही निशाणा साधत ते दरोडेखोर असल्याचेही पोटभरे म्हणाले.
जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. बीड व माजलगावमध्ये नद्यांना पूर आला. परंतु अतिक्रमणे वाढल्याने पुराचा धोका आहे. सांगली, साताऱ्यासारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. काही दुर्दैवी घटना घडली तर याला केवळ महसूल विभाग आणि पालिकाच जबाबदार आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग यांच्याकडे करोडो रुपयांचा निधी आला. परंतु त्यांनी कोणाला वाटला, हेच समजायला तयार नाही. विद्युत विभागातील योजना कागदावरच आहेत. आलेला निधी केवळ गुत्तेदार पोसण्यासाठीच वापरला जात असून, सर्वत्र भ्रष्टाचार होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही ‘आम्ही दोघे भाऊ भाऊ, आलेला माल वाटून खाऊ’ असे वागत असल्याचेही बाबुराव पोटभरे म्हणाले.
डॉक्टरांवर गंभीर आरोप
कोरोनात खाजगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी लाखो रुपयांची लूट केली. दोन लाख रुपयांच्या खाली कोणाचेच बिल केले नाही. याचे ऑडिट करून कारवाई करावी, अशी मागणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. आतापर्यंत चोऱ्या पाहिल्या होत्या, पण डॉक्टरांमधील दरोडेखोर पहिल्यांदाच पाहिल्याचा आरोपही पोटभरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
310821\31_2_bed_2_31082021_14.jpeg
बीडमधील पत्रकार परिषदेत बोलताना बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे. सोबत इतर पदाधिकारी