बायपासवरील घडना : चालकाचे प्रसंगावधान
बीड: धावत्या कारला रविवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास आग लागली. यात संपूर्ण कार जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे चौघे बालंबाल वाचले. बार्शी रोडवरील छत्रपती संभाजी चौकानजीकच्या बायपास परिसरात ही घटना घडली.
पाटोदा येथील हुले कन्स्ट्रक्शनमध्ये बाळासाहेब मोरे हे चालक म्हणून काम करतात. मालकाच्या तीन मुलांना घेऊन पाटोद्याहून ते कारमधून (क्र. जेएच १०-७०००) बीडकडे येत होते. रविवारी पहाटे दीड ते दोन वाजता ही कार बार्शी रोडवरील छत्रपती संभाजी चौकाजवळ आली. तेव्हा तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागली. कारने पेट घेतल्याचे चालक बाळासाहेब मोरे यांच्या लक्षात येताच, त्यांनी वेग कमी केला व सोबत असलेल्या मालकाच्या तीन मुलांना लगबगीने बाहेर काढले. त्यामुळे चौघेही बालंबाल वाचले. दरम्यान, आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. चालक मोरे यांनी तात्काळ बीड ग्रामीण पोलिसांना संपर्क केला. ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे हे सहकाऱ्यांसमवेत तेथे पोहोचले. चालक बाळासाहेब मोरे यांनी बीड ग्रामीण ठाण्यात अर्ज दिला असून, नोंद घेतल्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी सांगितले. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझविली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती.