महसूल,आरोग्य विभागाचे कर्मचारी प्लांटवर तळ ठोकून
अंबाजोगाई : कोरोनाची वाढती रूग्णसंख्या व त्यामुळे रूग्णांना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता भासत आहे. सध्या मागणीच्या तुलनेत तुटवडा जाणवत असल्याने ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा प्लांट आहे, तेथे अंबाजोगाईला ऑक्सिजन मिळावे यासाठी महसूलचे अधिकारी तळ ठोकून आहेत.
दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अंबाजोगाई तालुक्यात फक्त एप्रिल महिन्यात कोरोनाच्या रूग्णांनी साडेचार हजाराचा आकडा पार केला आहे. अंबाजोगाई सह धारूर, परळी, केज, माजलगाव, गंगाखेड, कळंब या ठिकाणाहून ही रूग्ण अंबाजोगाईत उपचारासाठी येतात. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटर अशा दोन ठिकाणी कोरोनाच्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अंबाजोगाई व लोखंडी सावरगाव या दोन ठिकाणी मिळून ऑक्सिजनचे ४५० बेड आहेत. अजूनही कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गंभीर व अतिगंभीर रूग्णांना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता आहे. ४५० ऑक्सिजन बेड उपलब्ध असूनही अजूनही या बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. आहे या रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाची धावपळ सुरू आहे.
अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील यांच्या अधिपत्याखाली २९ तलाठी व सर्व मंडलाधिकाऱ्यांची २४ तास रूग्णालयात ड्यूटी लावण्यात आली आहे. महसूलचे कर्मचारी औरंगाबाद, बीड, जालना, लातूर येथून ऑक्सिजन सिलिंडर भरून आणतात. या शिवाय चाकण,बेल्लारी येथून येणारी लिक्वीड ऑक्सिजन टँकरचे समन्वय साधणे या कामातच महसूलचे कर्मचारी व्यस्त आहेत. २४ तास धावपळ करून अंबाजोगाईतील रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मेहनत करून महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत.