आष्टी ( बीड ) : काॅलेजच्या पहिल्याच दिवशी २३ फेब्रुवारीच्या पहाटे बाॅम्बच्या जोरदार आवाजाने आम्ही झोपेतून जागे झालो. तेव्हाचा कळले युद्ध सुरु झाले. त्यानंतर बंकरमध्ये ७ दिवस काढले. मात्र, युद्धभूमीतून निघण्याचा निर्णय घेत आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो, तिथे रेल्वे नव्हती. दरम्यान, आमच्यासमोर फायरिंग, बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर आम्ही सर्वांनी काही अंतर चालत तर काही खाजगी बसने जात बोर्डरवर गाठली. तेथून भारतीय दुतावासाने आम्हाला मायदेशी आणले, असा थरारक अनुभव युक्रेन येथून परतलेला वैद्यकीय विद्यार्थी अनिकेत लटपटे याने कथन केला. तो आज सकाळी आष्टी येथील त्याच्या घरी परतला आहे.
आष्टी शहरातील मुर्शदपूर येथील भाऊसाहेब लटपटे यांचा मुलगा अनिकेत याने वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमधील खारक्यू येथील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. रशियाने हल्ला केल्याने अनिकेत युक्रेनमध्ये अडकला होता. धाडस आणि सीमेवर आल्यानंतर भारतीय दूतावासाची मदत यामुळे अनिकेत सुखरूप मायदेशी परतला आहे. युक्रेनमधून दिल्ली आणि आज सकाळी ८ वाजता अनिकेतचे शहरात आगमन झाले. यावेळी औक्षण करून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
माझ्यासमोर फायरिंग झाली युद्धभूमीत बाहेर पडण्याचा थरारक अनुभव यावेळी अनिकेतने सांगितला. शैक्षणिक पहिल्या वर्षाचा पहिला दिवस २३ फेब्रुवारी बॉम्बस्फोटाच्या मोठ्या आवाजाने सुरु झाला. त्यानंतर समजले की रशियाने युद्ध सुरु केले आहे. हॉस्टेलमधील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी बंकरमध्ये आश्रय घेतला. २ तारखेला येथून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो. तिथे रेल्वे नव्हती.दरम्यान, आमच्या समोर फायरिंग झाली, बॉम्ब पडले. यामुळे आम्ही सर्वांनी चालत जात सीमा गाठण्याचे ठरवले. प्रत्येक विद्यार्थी १० ते १५ लिटर पाणी घेऊन होता. २० किमी चालत प्रवासात अन्न नव्हते, काही सिनिअर विद्यार्थी एनर्जी बार देत. काही अंतर पार केल्यानंतर खाजगी बस करून आम्ही सीमा गाठली. येथे भारतीय दुतावासाने मदत करत दिल्लीत आणले. तेथून महाराष्ट्र शासनाच्या मदतीने आज सकाळी घरी आलो, असा अंगावर शहरे आणणारा अनुभव अनिकेत याने कथन केला.