शिरूर कासार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊन लागले आणि सर्वप्रथम मोठा फटका बसला तो एस. टी. महामंडळाला. वाहक, चालकांवर घरी बसण्याची वेळ आली. बस बंद असली तरी प्रपंचाची गाडी सुरळीत चालविण्यासाठी पर्याय म्हणून एस. टी. च्या वाहकाने शिरूरमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
बारा वर्षांपासून एस. टी. महामंडळात वाहक असलेले शिरूरचे शेख मुश्ताक हे पैठण आगारात आहेत. आता प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आल्याने आमच्या ड्यूट्या बंद झाल्या. मंगळवार-बुधवारी हजेरी लावण्यासाठी पैठणला जावे लागते, अन्यथा ते रजेत जमा धरले जातात. घरी चार माणसाचे कुटुंब, वाढती महागाई आणि तोकडा पगार त्यातही आता लाॅकडाऊन. बसगाड्या बंद, गाड्या बंद म्हणून खर्च थोडाच बंद होतो. याला पर्याय म्हणून आपण भाजीपाल विक्रीचा पर्याय निवडला असल्याचे शेख मुश्ताक यांनी सांगितले. मागील लाॅकडाऊनमध्येही आपण भाजी विक्री केली होती. आताही तोच व्यवसाय सध्या निवडला. बुडतीला काडीचा आधार या न्यायाने सकाळी जिजामाता चौकात आपण हा व्यवसाय करीत आहोत, असे सांगितले. माझ्या अनेक सहकारी कर्मचाऱ्यांनीही पर्याय म्हणून वेगवेगळे धंदे सुरू केले. बसवाहतूक पूर्ववत सुरू झाल्यानंतर होईल सर्व काही सुरळीत असा आशावाद वाहक शेख मुश्ताक यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांकडून ठोक भावात घेतो व किरकोळ भावात विकतो. त्यात दोन पैसे मिळतात. परिस्थितीपुढे हार न मानता परिस्थितीलाच हरविण्याची जिद्द बाळगली पाहिजे, असे शेख मुश्ताक म्हणाले.
===Photopath===
020521\02bed_4_02052021_14.jpg
===Caption===
एस. टी. महामंडळाच्या वाहकावर भाजी विकण्याची वेळ