दिंद्रूड : चाटगाव येथील लघुसिंचन तलावाची सुरक्षा करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने जे कर्मचारी कार्यरत केले आहेत. ते तलावाकडे फिरकतच नसल्याने या तलावाची सुरक्षा वाऱ्यावर असून, यामुळेच अज्ञाताने चाटगाव तलावाचा सांडवा फोडल्याचा प्रकार घडला. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक व दंडात्मक कारवाई करून तलावाची सुरक्षा करावी, अशी मागणी चाटगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
धारूर तालुक्यातील चाटगाव येथे काही वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने गावालगत लघुसिंचन तलाव केलेला आहे. या तलावाचा सांडवा सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने फोडल्याचा संतापजनक प्रकार घडला. वास्तविक पाहता तलावाची सुरक्षा करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे नियुक्त बीटप्रमुख तलावावर येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे चाटगाव तलावाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. जर तलावावर सुरक्षा असती अथवा संबंधित अभियंता व बीटप्रमुख जर अधूनमधून तलावास भेटी देत असते, तर हा प्रकार घडला नसता, असे शेतकरी सांगतात. पाटबंधारे विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरतेने दखल घेऊन अभियंता व बीटप्रमुखांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत संबंधित शाखा अभियंता व बीटप्रमुखास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
------
उन्हाळा वा पावसाळा कोणीच फिरकत नाही
संबंधित शाखा अभियंतादेखील तहसीलदारांनी आदेश दिल्याने उन्हाळ्यात या तलावावर अनधिकृत विद्युत मोटारी काढण्यासाठी आले होते. त्यानंतर तेही तलावाकडे फिरकले नसल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर यंदा पावसाळ्यात तलाव भरल्यानंतरही संबंधित शाखा अभियंत्यांनी तलावाची पाहणी करण्याची तसदी घेतली नसल्याचेही या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.
----------
190821\19bed_3_19082021_14.jpg~190821\19bed_2_19082021_14.jpg