बीड। केज : गावातील विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवा, निधी आम्ही देऊ, असे आश्वासन रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. गुरुवारी (दि.२१) होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात बीड जिल्हा शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक केज आणि बीड येथे पार पडली.
या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, अनिल जगताप, युद्धजीत पंडित, संगीता चव्हाण, परमेश्वर सातपुते, गिरीश देशपांडे, रत्नमाला मुंडे, चंद्रकला बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खैरे म्हणाले की, ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवून गावातील विकासकामे करण्यासाठी कामाला लागावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राची विकासाची गंगा गावागावांत पोहोचावी. भुमरे यांनी मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजना व संपर्क मंत्री या जबाबदारीने माझ्याकडील खात्यातील सर्व योजना प्रत्येक गावात पोहोचवण्याकरिता शिवसैनिकांनी कटिबद्ध राहावे व आम्ही मंत्री म्हणून वचनबद्ध राहू, असे अभिवचन दिले. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे यांनी आपल्या भाषणात शिवसैनिकांना सत्तेमध्ये बळ देण्यासाठी मंत्री महोदयांनी जबाबदारी द्यावी, असे आवाहन केले.