माजलगाव : येथील नगर परिषदेत झालेल्या 4 कोटी 13 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात डिसेंबर महिन्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये तीन मुख्याधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. याच प्रकरणात तपासाअंती सहाल चाऊस यांचा तपास निष्पन्न आरोपी म्हणून समावेश करून या बाबत येथील न्यायालयात त्यांना हजर केले असता शुक्रवार रोजी न्यायालयाने त्यांना 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
माजलगाव नगर परिषदेमध्ये 1 कोटी 44 लाख रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी व 4 कोटी 13 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी डिसेंम्बर महिन्यात माजलगाव शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात तीन मुख्याधिकारी, लेखापाल यांचा समावेश होता. 1 कोटी 44 लाख रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीअंती सहाल चाऊस यांचे नाव आल्याने ते मागील चार महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर 4 कोटी 13 लाख रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात देखील तपासाअंती तपास निष्पन्न आरोपी म्हणून चाऊस यांचे नाव या प्रकरणात समोर आल्याने त्यांना येथील प्रथमवर्ग न्यायाधीश पी.ए. वाघमारे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची म्हणजेच 8 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अँड. प्रताप माने यांनी काम पाहिले तर तपास अधिकारी म्हणून विजय लगड यांनी काम पाहिले.
दरम्यान या प्रकरणात असलेले तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी. गावित हे अद्याप फरार असून , लक्ष्मण राठोड व हरिकल्यान येलगट्टे या दोन मुख्याधिकाऱ्यांना जामीन मिळाला असून लेखापाल कैलास रांजवन व सूर्यकांत सूर्यवंशी यांना अंतरिम जामीन मिळालेला आहे. प्रकरणात अशोक कुलकर्णी वांगीकर यांना देखील पूर्वीच अटक झालेली असून दुसरे लेखापाल आनंद हजारे हे देखील अद्याप फरार आहेत.