बीड : कोरोनाकाळात सर्वात पुढे होऊन आरोग्य विभाग काम करतो. परंतू याच विभागातील जवळपास ११०० कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. लातूर उपसंचालक कार्यालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागातील लेखा विभागाच्या गलथान कारभाराचा फटका या कर्मचाऱ्यांना बसत असून संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागात आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायीका, आरोग्य सेवक, सेविका, परिचर, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तत्रज्ञ असे जवळपास ११०० कर्मचारी कार्यरत आहेत. मलेरिया, जिल्हा कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात हे सर्व कर्तव्य बजावतात. कोरोनाकाळात सर्वेक्षण, सुपरवायझर, नियंत्रण आदी कामे या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून केले. परंतु मागील दोन महिन्यांपासून त्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. फेब्रुवारी महिन्यातील वेतन मार्च अखेरीस मिळाले. तर मार्च व एप्रिल महिन्यातील वेतन अद्यापही अदा झालेले नाही. विशेष म्हणजे ३१ मार्चला निधी येऊन देखील लेखा विभागाच्या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांच्या हातावर अद्याप एकही रूपया मिळालेला नाही. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. याच मुद्यावरून हे सर्व कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या काय आहेत अडचणी?
उपसंचालक कार्यालयाकडून बजट वेळेवर न देणे, बीडमधून त्याची वेळेवर मागणी न करणे, बजटची कॉपी वेळेवर न आणने, चार व आठ माही बजट वेळेत न करणे, कॅशबुक न लिहीणे, जीपीएफचे शेड्यूल व कपाती हे वेळेवर जमा न करणे व त्यावर सनियंत्रण न करणे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कपाती न करणे, ऑफलाईन बजट एफडीतून आहरित करून संबंधित पंचायत समितीला वेळेत वितरीत न करणे आदी तक्रारी कर्मचाऱ्यांमधून आहेत.
कोट
मार्च महिन्यात बजट आले आहे. मार्च महिन्याचे वेतनाची फाईल डीएचओंकडे स्वाक्षरीला पाठविली आहे. एप्रिल महिन्याची मागणी केलेली आहे. लवकरच त्यांचे वेतन होईल.
गणेश क्षीरसागर, लेखा विभाग बीड