लोकमत इम्पॅक्ट
बीड : स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात ओपीडीमध्ये डॉक्टर हजर नसल्याने रुग्णांना तासन्तास ताटकळत बसावे लागत होते. याबाबत 'लोकमत'ने शुक्रवारी रिॲलिटी चेक करून या प्रकाराचा पर्दाफाश केला. यावर दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन तब्बल नऊ डॉक्टरांचे वेतन कपात करण्यात आले आहे. आरोग्य उपसंचालकांच्या आदेशानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी ही कारवाई केली आहे, याने दांडीबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ओपीडीमध्ये बसत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे सामान्यांचे हाल होत होते. हाच धागा पकडून 'लोकमत'ने गुरुवारी तपासणी करून शुक्रवारी वृत्त प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर खुद्द जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी राऊंड घेतला. यात मानसोपचार तज्ज डॉ. सुदमा मोगले व कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. मीनाक्षी साळुंके हे दोघे दोन दिवस नेहमीप्रमाणेच न सांगता गायब होते. त्यानंतर नेत्रतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाघ, भूलतज्ज्ञ डॉ. श्रीकांत मोराळे, डॉ. अर्जुन तांदळे यांनीही दांडी मारली. यांच्याबरोबरच आयुषही मागे नव्हता. डॉ.सचिन वारे, डॉ.वैशाली कदम, डॉ.हालिमा समरीन, डॉ.फारोखी आयमन यांनी देखील विभाग वाऱ्यावर सोडला होता. या सर्वांचे गैरहजर असलेल्या दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत. या कारवाईने दांडीबहाद्दरांचे धाबे दणाणले असून यापुढे कामात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उपसंचालकांकडून सीएस, एसीएसची कानउघाडणी
'लोकमत'च्या वृत्तानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी सीएस व एसीएस यांची चांगलीच कानउघाडणी केली. व्हिडीओ कॉलवर राऊंड घेतला. तसेच दांडीबहाद्दरांचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले. हलगर्जी करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचना दोन्ही अधिकाऱ्यांना दिल्याचे डॉ.माले म्हणाले. तसेच यापुढे डॉक्टर गैरहजर दिसल्यास एसीएसचा अहवाल शासनास पाठविणार असल्याचेही त्यांनी 'लोकमत'ला सांगितले.
---
विभागात गैरहजर असणाऱ्या ९ डॉक्टरांचे वेतन सीएसच्या स्वाक्षरीने पत्र काढून कपात करण्यात आलेले आहे.
डॉ. सुखदेव राठोड, अति.जिल्हा शल्यचिकित्सक बीड