बीड : कोरोना काळात संकटात केंद्र सरकारसह राज्य शासनानेही सामान्य नागरिकांना मोफत व माफक दरात धान्य मिळावे यासाठी मोठा साठा पाठवण्यात आला होता. मात्र, यापैकी थेट गोदामातून तर, काही माल रेशन चालकांकडून विक्री केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. तर, ज्यांना कमी दरात व मोफत धान्य मिळत आहे ते देखील १० ते १२ रुपये किलोने धान्य भुसार बाजारात विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
कोरोना काळात दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले जात होते. त्यानंतर दोन व तीन रुपये किलोने धान्य मिळत आहे. मात्र, याचा काहीजण गैरफायदा घेत असून, थेट गोदामातून मालाची विक्री किंवा रेशन दुकानदारांकडून रेशनचा माल विकल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र, लाभार्थीच कमी पैशात धान्य घेत त्याची विक्री १० ते १२ रुपये किलोने करत आहे.
१० रुपये किलो तांदूळ
स्वस्त धान्य दुकानातून घेतलेले तांदूळ १० रुपये किलो दराने हॉटेल व इतर ठिकाणी विक्री केली जात आहे. त्यासाठी ग्रामीण व शहरी भागात धान्य खरेदी करण्यासाठी काहीजण फिरताना दिसतात.
हे घ्या पुरावे
पेठ बीड
शहरातील पेठ बीड भागात स्वस्त धान्य खरेदी करण्यासाठी खासगी व्यापारी फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून, त्याला प्रतिसाद मिळत आहे.
हिंगणी
शहराप्रमाणे ग्रामीण भागात देखील रेशन धान्य खरेदी करण्यासाठी वाहनं घेऊन फिरत आहेत. या धान्य खरेदीची सुरुवात ५ रुपये किलोपासून केली जाते. शेवटी १० ते १२ रुपये किलोने खरेदी केली जाते.
सात्रा
येथे देखील रेशनचे मोफत मिळालेले धान्य विक्री करून त्याबदल्यात काही वस्तू खरेदी करताना काहीजण आढळून आले होते. त्याच पद्धतिने इतर गावांध्ये देखील असे धान्य कमी दरात खरेदी केले जाते.
पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांपर्यंत धान्य पोहचवणे व ते लाभार्थ्यांना मिळाले की नाही याची खातरजमा करणे इतपर्यंतच काम केले जाते. त्यानंतर लाभार्थ्यांकडून त्याचे काय केले जाते याविषयी सांगणे कठीण आहे. परंतु शासनाने मोफत व अत्याल्प दरात दिलेले धान्य खरेदी करणे गुन्हा आहे.
संजिव राऊत
नायब तहसीलदार पुरवठा विभाग बीड