दीपक नाईकवाडे
केज : कृषी पदवी मिळाली, पण नोकरीचे प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत काय? करायचे? व्यवसाय करायचा तर भांडवल कसे उभे करायचे? कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला तर तो चालेल की नाही? मग पुन्हा काय? असे अनंत प्रश्न समोर असताना तालुक्यातील साळेगाव येथील २५ वर्षांच्या गजानन इंगळे याने ऐन उन्हाळ्यात ढोबळी मिरची लागवडीचा निर्णय घेतला. ही मिरची थेट हैदराबादच्या बाजारात पाेहोचली. सध्या यातून दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असून एकूण सात ते आठ लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा आहे.
कृषी पदवीधर झाल्यानंतर गजाननने नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. व्यवसायासाठी भांडवली अडचणी होत्या. त्यामुळे आपल्या वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक पीक न घेता कृषी पदवीच्या ज्ञानाचा उपयोग करायचे त्याने ठरविले. कोरोनाच्या महामारीमुळे बंद, संचारबंदी व लॉकडाऊन असतानाही त्याने हिंमत दाखवून ऐन उन्हाळ्यात आपल्या एक एकर क्षेत्रावर बेळगाव पोपटी या वाणाची ढोबळी मिरची लागवडीचा निर्णय घेतला.
शेणखत, कंपोस्ट खत व इतर खतांच्या बेसल डोसद्वारे जमीन तयार केली. त्यावर पाच फूट अंतरावर बेड तयार करून ठिबक सिंचन व मल्चिंग केले. ६ फेब्रुवारी रोजी लागवड केली. त्याला १३ हजार रोपे लागली. ड्रीपद्वारे खत व औषध फवारणी केली. दीड लाख रुपये खर्च करीत त्यानंतर लागवडीच्या ५० व्या दिवसांपासून मिरची बहरात आली. आतापर्यंत ४ वेळा तोडणी केली असून सुमारे साडेबारा टन एवढे उत्पादन निघाले आहे. सध्या ही मिरची कळंबच्या व्यापाऱ्यामार्फत हैदराबाद येथे विक्रीसाठी जात आहे. सध्या या मिरचीला सुमारे २० ते २२ हजार रुपये टन भाव आहे. आतापर्यंत चारवेळा मिरचीची तोडणी झाली आहे. यातून २ लाख ६० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
सुमारे ३५ ते ४० टनाच्या आसपास मिरचीचे उत्पादन व सात लाखांच्या आसपास उत्पन्न होण्याची खात्री आहे. एक एकर शेतीत अवघ्या तीन महिन्यांत सुमारे साडेसहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आधुनिक पद्धतीने शेती आणि बाजारभावाचा अंदाज घेऊन लागवड केली तर निश्चित फायदा होतो.
-गजानन इंगळे, कृषी पदवीधर
लॉकडाऊनमुळे आम्ही गजानन इंगळे यांच्या शेतात एक महिन्यापासून कामाला आहोत. त्या मजुरीतून आम्ही आमच्या कुटुंबाच्या रोजी-रोटीचा प्रश्न भागवित आहोत.
- नीलावती सरवदे, मजूर.
===Photopath===
040521\deepak naikwade_img-20210504-wa0012_14.jpg