- संतोष स्वामी
दिंद्रुड (बीड) : दिंद्रुड पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकपदी कर्तव्य बजावत असलेले विजेंद्र नाचन यांचा आज नगर जिल्ह्यातील राहुरी येथील दिपाली यांच्यासोबत विवाह ठरला होता. मात्र कोरोनाचे संकट वाढत गेले आणि विजेंद्र यांनी देशसेवेला प्रथम प्राधान्य देत लग्न पुढे ढकले. कोरोना विरुद्धचा लढा मोठ्या हिरीरीने ते लढत असून आजच त्यांनी अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून कर्तव्य बजावले आहे.
विजेंद्र व दिपाली हि दोघेही आपापल्या आईवडिलांना एकुलते एक अपत्य आहेत. यामुळे सहाजिकच त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडण्याचे सर्व नातेवाईकांचे स्वप्न होते. यानुसार २६ एप्रिलला त्यांचा विवाह ठरला. मात्र कोरोनाच्या संकटाने दोन्ही कुटुंबांनी हा विवाह पुढे ढकला. दरम्यान, रेशीमगाठीत गुंतण्याच्या आजच्या दिवशी पीएसआय विजेंद्र पोलीस सेवेचे आपले कर्तृत्व बजावत आहेत. त्यांनी सकाळीच एका अवैध हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकली आहे. हे फक्त पीएसआय विजेंद्र यांच्या बाबतीतच घडतय अस नाही तर कोरोना विरुद्ध लढाईत सहभागी अनेक तरुणांच्या बाबतीत घडत आहे. हे सर्व कर्मचारी आपल्या स्वप्नांचा त्याग करून तुम्हाआम्हांच्या संरक्षणासाठी कर्तव्यावर आहेत. तेंव्हा घरीच रहा सुरक्षित रहा असे आवाहन पीएसआय विजेंद्र यांनी केले आहे.
महासंकटात देशसेवा करण्याचा आनंदलहानपणापासुनच देशासाठी काहीतरी योगदान देण्याचे स्वप्न होते,यामुळे पोलिस सेवेत आलो. लग्न काही काळाने करता पण या महासंकटात पणतीच्या प्रकाशा इतकी देशसेवा करता येत आहे याचा आनंद आहे.-विजेंद्र नाचन,पीएसआय
विवाह लांबल्याचे दुःख नाहीविजेंद्र पोलिस सेवेच्या माध्यमातून जनसेवा करतात यामुळे त्यांचा अभिमान वाटतो. विवाह काही दिवसांनी होईलच त्यापेक्षा सद्य परिस्थितीमध्ये देशसेवेची महत्वाची भूमिका विजेंद्र बजावत आहेत. यामुळे विवाह लांबल्याचे दुख: वाटत नाही. - दिपाली गडदे,राहुरी