बीड : माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी येथील गर्भवतीला आरोग्य केंद्रात आणून प्रसुती करावी, या उद्देशाने गेलेल्या आरोग्य सेवकांना जीवघेणा प्रवास करावा लागला आहे. गव्हाणथडी गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गोदावरी नदी पात्रातून चप्पूमध्ये बसून सेवकांनी गाव गाठत तिचे समुपदेशन केले आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला. सेवकांच्या कर्तव्याला सलाम केला जात आहे.
माजलगाव तालुक्यातील टाकरवण आरोग्य केंद्र आहे. याच केंद्रांतर्गत गव्हाणथडी गाव येते. या गावात एका गर्भवती महिलेचे दिवस भरल्याने तिला आरोग्य केंद्रात आणणे आवश्यक होते. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदाराणी नरवडे यांनी आरोग्य सेवक ज्ञानेश्वर गरड आणि गटप्रवर्तक जयश्री नेहरकर यांना सुचना केल्या. या कर्मचाऱ्यांनी तात्काळ गव्हाणथडी गाठले. परंतू हिवरा गावातून गव्हाणथडीला जाण्यासाठी रस्ता नाही. गोदावरी नदी पात्र आडवे असल्याने समोर जायचे कसे? असा प्रश्न होता.
या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता लगेच बाजुला असलेल्या चप्पूमधून प्रवास सुरू करत गव्हाणथडीचे टोक गाठले. संबंधित गर्भवतीचे समुपदेशन केले. तीला आरोग्य केंद्रात प्रसुती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासह विश्वास दिला. परंतू पाऊस असल्याने त्या गर्भवतीला तात्काळ आरोग्य केंद्रात आणणे शक्य झाले नसल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी पर्याची व्यवस्था करून आणणार असल्याचे गट प्रवर्तक नेहरकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या या धाडसी कर्तव्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख, माजलगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे, डॉ.चंदाराणी नरवडे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनेंद्र बागलाने, उपाध्यक्ष वसंत सानप यांच्यासह सर्व तालुका, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.
समुपदेशन केलेगव्हाणथडी गावात गर्भवती महिला होती. तिला सध्या कळा नव्हत्या, परंतू अचानक धावपळ होऊ नये, पाऊस सुरू, रस्त्याच्या प्रश्न आदींचा विचार करून आम्ही गावात पोहचलो. रस्त्यात गोदावरी नदी लागते. याच नदीतून चप्पूवर बसून आम्ही गेलोत. त्या महिलेला सर्व मार्गदर्शन आणि समुपदेशन केले.- जयश्री नेहरकर, गट प्रवर्तक, टाकरवण
सर्व सोयी दिल्या जातातप्रत्येक गर्भवतीचे समुपदेशन केले जाते. चालू वर्षात ५ प्रसुती झाल्या. गव्हाणथडी गावातील ये-जा करण्याची गैरसोय असल्याने गर्भवतीला आरोग्य केंद्रात आणण्याचे नियोजन आहे. जेवण, राहणे सर्व सुविधा पुरविल्या जातील. नातेवाईकांचेही समुपदेशन केले आहे. शेवटी निर्णय त्यांचा आहे.- डॉ.चंदाराणी नरवडे, वैद्यकीय अधिकारी, टाकरवण