बीड : राज्यात दुष्काळ पडला असताना दुष्काळसदृष्य परिस्थितीचा शब्दखेळ करत राज्य सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा चालविली आहे. शनिवारी रात्री राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी चक्क बॅटरीच्या उजेडात होरपळलेल्या पिकाची पाहणी उरकल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढेवेढे घेतले जात आहेत. राज्यात दुष्काळ सदृष्य़ परिस्थिती असून 30 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करू अशा घोषणा केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आपआपल्या भागात दौरे आयोजित करून पाहणी सुरु केली आहे. माजलगावच्या नित्रुड गावात दुष्काळस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर शनिवारी रात्री आले होते. त्यांनी चक्क छोट्या बॅटरीच्या प्रकाशात पीकांची पाहणी केली. ही पाहणी त्यांनी 20 मिनिटांत आटोपल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.