लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बस्ता बांधला, मंडप सजला, वºहाडी आले, घोड्यावर बसून नवरदेव लग्न मंडपात आले, शुभ मंगल सावधान..म्हणणार तोच पोलीस मंडपात धडकले. लहान वयात विवाह करणे गुन्हा असल्याचे सांगत त्यांनी बालविवाह रोखले. यामध्ये वधू या सख्ख्या चुलत बहिणी होत्या तर वर सख्ये भाऊ होते. विशेष म्हणजे हे चौघेही अल्पवयीन होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे होणारे हे बालविवाह रोखण्यात आले.
गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथे शेतकरी कुटुंबातील मुलींचे याच तालुक्यातील सिरसमार्ग येथील सख्ख्या भावांसोबत विवाह ठरला. यामध्ये वधू या सख्ख्या चुलत बहिणी होत्या तर वर हे सख्ये भाऊ होते. मुली नववीच्या वर्गात शिक्षण घेत असून, मुलांचे वय १९ व २० असे आहे. बुधवारी सकाळी १०.३० वा. बालविवाह होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे, अशोक तांगडे यांना मिळाली. त्यांनी खात्री करुन हा प्रकार अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, गेवराईचे तहसीलदार संजय पवार यांच्या कानी घातला. त्यांनी तात्काळ यंत्रणा हलवत पांढरवाडीत आपले अधिकारी, कर्मचारी पाठविले. खात्री केली असता हे चौघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यानंतर वधू व वराकडील माता-पित्यांना बोलावून घेत त्यांचे समुपदेशन करण्यात आले. सज्ञान झाल्यावरच त्यांचे विवाह लावले जातील, असे लेखी लिहून घेतल्यानंतर यंत्रणा परतली.
दरम्यान, व-हाडी मंडळींना अक्षता न टाकताच परतण्याची वेळ आली. काहींनी जेवण केले तर काहींनी काढता पाय घेतला. बालविवाह रोखून त्यांचे समुपदेशन करण्यात गेवराई महसूल व पोलीस प्रशासनाने यश मिळविले.मुलींचा लग्नाला विरोधसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मुली या शिक्षणासाठी बाहेरगावी होत्या. त्यांना शिक्षणाची आवड आहे. त्यांचा या लग्नासाठी विरोध होता. ‘आम्हाला शिकू द्या’ असे त्यांनी त्यांच्या आई-वडिलांनाही सांगितले होते. परंतु त्यांनी त्यांचे न ऐकता विवाह करण्यास सांगितले.