- पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड): पाराशर बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड गोवा स्थित कंपनीचे बोगस खत तयार करून त्याची विक्री होत असल्याबाबत कंपनीने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे याचिका दाखल केली होती. याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशावरून पथकाने माजलगाव येथील तीन व्यापाऱ्यांना बोगस खत विक्री करत असताना रंगेहाथ पकडले. यावेळी प्लांटो नावाच्या कंपनीचे 30 पोते जप्त करण्यात आले आहेत.
माजलगाव शहरामधून बोगस खतांची विक्री होत असल्याबाबत अनेक तक्रारी होत्या. तसेच प्लांटो नावाचे उसासाठी वापरले जाणारे खत हे कंपनीचा लोगो वापरून तसेच कंपनीच्या ओरिजनल खताच्या बॅगेप्रमाणे दुसरी डुप्लिकेट बॅगा बनवून मार्केटमध्ये दुसऱ्या कंपन्यांकडून विक्री होत असल्याबाबत कंपनीने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दावा दाखल केला होता. या दाव्याच्या अनुषंगाने न्यायालयाने विशेष इन्स्पेक्टर म्हणून संदीप हांगे यांची नियुक्ती केली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर स्वप्नील कोलते , संतोष जवंजाळ ,अशोक कलापुरे, मनोज कोलते , सचिन अकोलकर तसेच स्थानिक पोलिस पो.ना.तोटेवाड,पो.कॉ.ठेंगल, पो.कॉ.कांनतोडे, पो.कॉ.देवरकोंडे सोबत घेऊन येथील गणेश कृषी सेवा केंद्र इतर दोन ठिकाणी छापे टाकले. यावेळी दुकानात बोगस खतांची ३० पोते आढळून आले. त्यामुळे मोंढा परिसरात खत व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडालेली पहावयास मिळाली. दरम्यान, कोळसा आणि वाळू मिश्रित बनावट खतामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना ते सावधानतेने करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांनी केले आहे. तसेच बोगस खत विक्री करणाऱ्यांची देखील गैर केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
खताऐवजी पोत्यात वाळू मिश्रित कोळसा!काही बनावट कंपन्या पैशाच्या लोभापाई शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्या आहेत. वारेमाफ पैसा कमावण्याच्या उद्देशाने खताऐवजी चक्क कोळसा मिश्रीत वाळूची काही व्यापारी विक्री करत आहेत.