लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वाळू वाहतूक करण्यासठी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना हप्ते द्यावे लागत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू कंत्राटदार व वाहतूकदार यांनी दिले होते. त्यानंतर ठेकेदार, वाहतूकदार पैसे देत असतील तर ते देखील दोषी असून, त्यांच्याकडून कारवाई होऊ नये यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच विभागाची बदनामी केल्याप्रकरणी नोटीस देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे ठेकेदार व कंत्राटदार कोणत्या अधिका-याला पैसे दिले याचे पुरावे गोळा करु लागले असल्याची सूत्रांची माहिती आहे.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अवैधरित्या वाळू वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश बैठक घेऊन संबंधित अधिका-यांना केले आहेत. विशेष म्हणजे बैठकीला जिल्ह्यातील वाळू वाहतूक व ठेकेदार बोलावले होते. त्यांना देखील जिल्हाधिकारी यांनी अवैध वाळू वाहतूक व साठा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच कोणतेही वाहन पकडले तर ते पुन्हा रस्त्यावर दिसणार नाही अशी कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. त्यानंतर वाळू वाहतूक व ठेकेदारांनी परवानगी असून तसेच वाळू वाहतूक करताना रितसर पावती असताना, देखील अनेक महसूल व पोलीस अधिका-यांना हप्ते द्यावे लागत असल्याचे ‘रेटकार्ड’ सह अप्पर जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. यामध्ये पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाची कारवाई होऊ नये यासाठी दबाव आणला जात असून, कायद्यानुसार लाच देणारा देखील दोषी आहे. त्यांमुळे निवेदनात नाव असलेल्यांनी हप्ते दिले याचे पुरावे दिले नाही, तर त्यांच्यावर प्रशासनाची बदनामी केल्याप्रकरणी नोटीस देऊन कायदेशीर कारवाई होऊ शकते अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना दिली होती. त्यानंतर निवेदनात नाव असलेल्या वाहतूकदार व ठेकेदारांनी पैसे दिल्याचे व कोणाला दिल्याचे पुरवे गोळा करणे सुरु केले आहे. त्यामुळे या निवेदनाला वेगळेच वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे.वाळू वाहतूक व ठेकेदारांनी दिलेल्या निवेदनातील ‘रेटकार्ड’नुसार महसूल व पोलीस विभागातील त्या खात्याच्या प्रमुखांची चौकशी होणार का ? तसेच पोलीस व महसूल विभागाची बदनामी केल्याप्रकणी वाळू ठेकेदार व वाहतूकदारांना नोटीस मिळून कायदेशीर कारवाई होणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नोटीस देण्याच्या भूमिकेनंतर पुरावे जमवण्यात वाळू ठेकेदार व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:23 AM