माजलगाव (बीड ) : तहसिलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी सावरगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा एक हायवा ट्रक पकडला. यानंतर तहसील कार्यालयात परतत असताना जप्त हायवा ट्रकला वाळू माफियांनी अडवून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सात जणांवर चोरी व शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील हिवरा (बु) या ठिकाणी 10-12 दिवसापासुन वाळूचा ठेका सुरु आहे. या ठेक्यावरुन सर्व नियमांची पायमल्ली करुन वाळू उपसा सुरु आहे. या ठिकाणावरुन हायवा मध्ये तीन ब्रास वाळू ला परवानगी असतांना पाच ते सहा ब्रास वाळू घेवून जात असल्याची माहिती तहसिलदार डॉ.प्रतिभा गोरे यांना मिळाली. डॉ. गोरे या मंगळवारी (दि.२३ ) सायंकाळी 5 वाजता बीडवरुन शासकीय कामकाज आटोपून येत असतांना सावरगाव शिवारात त्यांनी वाळूची वाहतूक करणारा एक हायवा ( क्र.एम.एच.23 डब्बलु 2302 ) अडवला. तपासणी केली असता त्यात पाच ब्रास वाळू आढळून आली.
शासकीय चालक संजय भागवत यास हायवा तहसील कार्यालयात आणण्यास सांगितले. रस्त्यामध्ये हायवास जीवन जगताप, नागेश पडघम व इतर चारपाच जणांनी अडवला व चालक भागवत यांना खाली खेचले. त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत हायवा पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीवरुन राञी 11-30 वाजता वरील आरोपी विरुद्ध चोरी व शासकीय कामात अडथळा,जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी व महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966,21(1),महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके हे करत आहेत.