अंभोरा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याऐवजी वाळूची वाहने जाग्यावरच सोडून दिली. त्याचदिवशी म्हसोबावाडी फाट्यानजीक अवैध वाळू घेऊन जाणारा टिप्पर पोलीस ठाण्यात नेवून लावला, त्यानंतर कायदेशीर कारवाई न करता त्याला मध्यरात्री दोनच्या सुमारास सोडून दिले. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाल्याची माहिती असून, त्याची तपासणी करून व या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
महसूल प्रशासनाला कळवलेच नाही
पोलीस प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करताना वाहने ताब्यात घेतल्यानंतर त्याची माहिती स्थानिक महसूल प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. त्यांच्या फिर्यादीनंतर पुढील गुन्हा दाखल व दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, पोलिसांनी या वाहनांची माहिती महसूल प्रशासनाला दिलीच नाही. अर्थपूर्ण व्यवहारातून ही वाहने सोडण्यात आली असून, संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आर्थिक तडजोड करून वाहने सोडण्याचा प्रकार घडला असेल, तर यासंदर्भात माहिती घेऊन त्यानंतर चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- विजय लगारे, उपअधीक्षक, आष्टी