बीड : दोन कोटी रूपयांच्या चंदन तस्करीतील मुख्य आरोपी असलेला बालाजी जाधव हा नगरसेवक अद्यापही मोकाटच आहे. तसेच अटक केलेल्या दोघांना ११ मे पर्यंत पोलिस कोठडी आहे. असे असतानाही तपासात काहीच गती नाही. त्यामुळे केजचे पोलिस करतात काय? असा प्रश्न आहे.
केज - धारूर रोडवर ५ मे रोजी पोलिसांनी कारवाई करून १ कोटी ९७ लाख ६८ हजार रुपयांचा चंदनाचा गाभा आणि २० लाख ६३ हजार रुपयांचा टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला होता. यामध्ये प्रितम काशीनाथ साखरे (वय ३४ वर्षे, रा. गुरुवार पेठ, अंबाजोगाई), शंकर पंढरी राख (रा.कौडगाव) यांना ताब्यातही घेतले होते. तर मुख्य आरोपी असलेला केजमधील राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) नगरसेवक बालासाहेब उर्फ बालाजी दत्तात्रय जाधव (वय ४२ वर्षे रा.केज) हा कारवाईनंतर फरार झाला होता.
पोलिसांनी याच्या शोधासाठी दोन पथके नियूक्त केल्याचा दावा केला असला तरी चार दिवस उलटूनही तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तसेच ताब्यात असलेले दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असतानाही त्यांच्याकडून तपासात काहीच माहिती मिळालेली नाही, असे केजचे ठाणेदार प्रशांत महाजन सांगतात. मुख्य आरोपी मोकाट, ताब्यातील आराेपींकडून काहीच माहिती समजेना, मग केज पोलिस आणि ठाणेदार करतात काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, बालाजी हा महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या प्रचारात तो त्यांच्यासमवेत सक्रीय होता. कारवाईनंतर सोनवणेसोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
केंद्रीय मंत्र्यांचीही मुख्यमंत्र्यांकडे मागणीकेजच्या चंदनचोरीचा विषय ७ मे रोजी अंबाजोगाईत झालेल्या सभेतही निघाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपिठावर येण्याआगोदर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे भाषण झाले. यामध्ये त्यांनी या चंदनतस्कराला शोधून काढा. त्याच्या मुळाशी जावून कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतरही केज पोलिसांनी याला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. केवळ कारवाई केल्यानंतर मोठा बोभाटा करत पाठ थोपटून घेण्यात आली होती. जशी कारवाई केली, तसा तपास होत नसल्याने संशय व्यक्त होत आहे.
शोध सुरू आहे अटक असलेल्या दोन्ही आरोपींना ११ मे पर्यंत पोलिस कोठडी आहे. या प्रकरणाच्या तपासात गती नाही. तसेच तिसरा आरोपी बालाजी जाधव हा अजूनही फरार असून शोध सुरू आहे.- प्रशांत महाजन, पोलिस निरीक्षक, केज