अंबाजोगाई (बीड) : येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्या शासकीय निवासस्थानी चोरट्यांनी बुधवारी पहाटे चंदनाच्या झाडावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्याच्या भुंकण्याने मिसकर यांना जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.
अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी सांगितलेली माहिती अशी की, २७ जून रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास कुत्र्याच्या आवाजामुळे मला जाग आली. खिडकीच्या बाहेर पाहिले असता मला एक माणूस पळताना दिसला. त्या व्यक्तीने डोक्याला काहीतरी पांढरे कापड बांधले होते. कोण आहे बाहेर? असे ओरडल्यानंतर तो निवासस्थानाच्या मागच्या बाजूस जाऊन पळून गेला. या प्रकरणी सुरक्षारक्षकांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, शेतात असणाऱ्या चंदनाच्या झाडांची चोरी तर नित्याची बाब ठरली आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन चंदनाच्या झाडाच्या चोरीचा प्रयत्न होत असल्याने चंदन चोरांचे धाडस वाढले असेच म्हणावे लागेल.