बीड : जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकमेव असलेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांचे आगामी विधानसभा निवडणूकीत उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यांच्यावर विरोधकांकडून कायम टक्केवारी घेतल्याचा आरोप करण्यात आला. ते पुण्यात झालेल्या मुलाखतीलाही हजर नव्हते. हेच सर्व पाहून पक्षाकडून नवा चेहरा शोधला जात असल्याचे समजते.
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत संदीप क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा निसटता पराभव केला. एक तरूण आमदार मिळाल्याने मतदार संघात विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा लोकांना होती. परंतू त्यांच्यावर सुरूवातीपासूनच विराेधकांनी टक्केवारीचा आरोप केला. तसेच लोकसभा निवडणूकीत जरांगे फॅक्टर चालल्याने यावेळी मराठा उमेदवार देण्याचा विचारही पक्ष करत आहे. त्यामुळेच सीए बी.बी.जाधव सह अनेकजण मुलाखती देऊन आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी खा.बजरंग सोनवणे हे देखील उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून सोनवणे आणि आ.क्षीरसागर यांच्यात जमत नसल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळेच खा.सोनवणे यांच्याकडून बीडमध्ये नवा चेहरा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बातचीत झाल्याचीही चर्चा आहे.
या लोकांनी सोडली साथविधानसभा निवडणूकीत तेव्हाचे नगरसेवक अमर नाईकवाडे, फारूख पटेल यांच्यासह इतर अनेक लोकांनी संदीप क्षीरसागर यांचे काम केले. परंतू नंतर काही दिवसांतच त्यांनी क्षीरसागरांची साथ सोडली. त्यानंतर माजी आ.सुनिल धांडे यांनीही संदीप क्षीरसागर यांना सोडले. जिल्हाध्यक्ष असल्याने इतर पदाधिकारी त्यांच्याबद्दल नाराज आहेत. तालुकानिहाय बैठका आणि पदाधिकाऱ्यांशी समन्वय नसल्याचेही चर्चा आहे.
योगेश क्षीरसागरांनी केला गंभीर आरोपकाही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना रोडवर पाणी साचले. हे पाणी अनेकांच्या दुकानात, घरात शिरले. यामुळे त्रास तर झालाच, शिवाय नुकसानही झाले. याला केवळ बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हेच जबाबदार असल्याचा आरोप अजित पवार गटाचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केला होता. टक्केवारीमुळेच बोगस काम झाल्याची टिकाही केली होती.
वडिल अन् भाऊही विरोधातसंदीप क्षीरसागर यांचे वडिल रविंद्र क्षीरसागर हे देखील विरोधात आहेत. काही महिन्यांपूर्वी घरगुती वादातून धक्काबुक्की केल्याप्रकरणी रविंद्र क्षीरसागर यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रारही दिली होती. यासह भाऊ माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे देखील त्यांच्यापासून दुरावले आहेत.