Sangita Thombare ( Marathi News ) : भाजप नेत्या आणि केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थित हा प्रवेश कार्यक्रम झाला. त्यानंतर लगेचच ठोंबरे यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संगीता ठोंबरे यांच्यासह भाजप युवानेते दीपक शिंदे आणि चनई परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. परिणामी ऐन विधानसभा निवडणुकीत केजमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील भाजप उमेदवार नमिता मुंदडा यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
ठोंबरेंनी मागे घेतला उमेदवारी अर्ज
केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला. संगीता ठोंबरे यांच्या या निर्णयामुळे महायुतीची डोकेदुखी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, २०१४ मध्ये संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. परंतु २०१९ च्या निवडणुकीत संगीता ठोंबरे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आता पुन्हा या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला.